आयपीएलच्या बाराव्या हंगामात, चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिले ३ सामने जिंकणाऱ्या चेन्नईला मुंबईने घरच्या मैदानावर खेळत असताना पराभवाचं पाणी पाजलं. १७१ धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेला चेन्नईचा संघ मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. केदार जाधवचा अपवाद वगळता सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. महेंद्रसिंह धोनीकडून चेन्नईच्या पाठीराख्यांना आशा होती, मात्र तो देखील २१ चेंडूंमध्ये अवघ्या १२ धावा करु शकला. हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवकरवी त्याला माघारी धाडलं. या सामन्यात धोनीला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नसला, तरीही त्याच्या प्रसिद्धीत जराही फरक पडला नाहीये. बुधवारी वानखेडे मैदानावर याचा प्रत्यय आला.

सामना संपल्यानंतर एक आजीबाई, केवळ धोनीची भेट घेण्यासाठी मैदानावर थांबून राहिल्या होत्या. धोनीला ही बातमी समजताच त्याने वेळात वेळ काढून, आजीबाईंची भेट घेतली. आपल्या लाडक्या खेळाडूला समोर पाहताना, आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. “तुझा खेळ मला खूप आवडतो आणि आज तुला भेटूनच मी जाईन असं ठरवलं होतं”, असं म्हणत आजींनी धोनीचे आभार मानले. यावेळी धोनीने आपल्या या खास फॅनसोबत सेल्फी घेत त्यांची इच्छाही पूर्ण केली. या भेटीचा व्हिडीओ चेन्नई सुपरकिंग्ज आणि आयपीएलच्या अधिकृत फेसबूक पेजवर टाकण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईविरुद्धच्या खेळीत धोनीने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत असताना धोनीने ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी त्याला मुंबईविरुद्धच्या सामन्यात अवघ्या २ धावांची गरज होती. धोनीआधी सुरेश रैनाने अशी कामगिरी केली आहे. रैना चेन्नईकडून ५ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : सामना गमावूनही धोनीच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजाचा सामना करु शकला नाही. अखेरच्या षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा शंभरावा विजय ठरला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये.

अवश्य वाचा – IPL 2019 : एका षटकात हार्दिकने सामना फिरवला, ब्राव्हो ठरला सर्वात महागडा गोलंदाज