IPL 2019 या स्पर्धेचे बहुप्रतीक्षित वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. २३ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

आजी-माजी कर्णधारांमधील लढतींबरोबरच या स्पर्धेतील आणखी एक सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. हा सामना म्हणजे भारताच्या दोन सलामीवीरांमधील सामना… रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. २४ मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे.

दरम्यान, IPL यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे IPL देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यात येणार आहे. मुंबईचे या वेळापत्रकानुसार २ सामने घरच्या मैदानावर आणि २ सामने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळण्यात येणार आहेत.

दिल्ली व्यतिरिक्त चेन्नईशी होणार सामना मुंबईच्या मैदानावर ३ एप्रिलला होणार आहे. तर २८ तारखेचा बंगळुरूविरुद्धचा सामना आणि ३० तारखेचा पंजाबविरुद्धचा सामना प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर होणार आहे.