IPL 2019 MI vs KKR : लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर खेळताना कोलकात्याला १३३ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. पहिल्या षटकापासून मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या धावगतीवर अंकुश ठेवला. कोलकाताकडून ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पाचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही.

शुभमन गिल (९) आणि ख्रिस लिन (४१) जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हार्दिक पांड्याने गिलला माघारी धाडत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने ख्रिस लिनही माघारी परतला. रॉबिन उथप्पाने संघर्षपूर्ण ४० धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची त्याला साथ लाभू शकली नाही. ठराविक अंतराने फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे कोलकाताचा संघ मोठी भागीदारी रचू शकला नाही.

या सामन्यात साऱ्यांचे लक्ष होते ते कोलकाताचा भरवशाचा खेळाडू आंद्रे रसलच्या खेळीकडे… पण या सामन्यात रसल पूर्णपणे अपयशी ठरला. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती घेऊन खेळणारा दिनेश कार्तिक लवकर बाद झाल्यावर रसल मोठी फटकेबाजकी करेल असे चाहत्यांना वाटत होते. पण रसाळ नावाच्या वादळाला मलिंगाने अगदी पहिल्याच चेंडूवर रोखले. राउंड द विकेट गोलंदाजी करत मलिंगाने रसलच्या छातीजवळून चेंडू जाईल अशा पद्धतीने चेंडू टाकला आणि त्या जाळ्यात रसल फसला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता तो माघारी परतला.

हा पहा व्हिडीओ –

सामन्यात मुंबईकडून लसिथ मलिंगाने ३ फलंदाजांना माघारी धाडलं.

त्याला हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने २-२ बळी घेत चांगली साथ दिली.