IPL 2019 MI vs SRH Live Updates : मुंबईच्या वानखेडे मैदानावरील सामन्यात मुंबईने ५ बाद १६२ धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकने नाबाद ६९ धावांची खेळी केली, पण हैदराबादने शिस्तबद्ध गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत मुंबईच्या धावफलकावर अंकुश लावला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण डी कॉक वगळता कोणीही जबाबदारीने खेळ न केल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

कायरन पोलार्ड यांच्याकडून मुंबईला अपेक्षा होत्या. मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही. पण तरी देखील एका विचित्र कारणामुळे तो चर्चेत आला. चौथ्या षटकात साहाने चेंडू टोलवला. तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना पोलार्ड इतका सुसाट धावला की त्याला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. तो चेंडू आडवताना थेट डिजिटल जाहिराती असलेल्या सीमारेषेवर धडकला आणि त्यावरून थेट मैदानाबाहेर पडला.

हा प्रकार पाहिल्यावर क्विंटन डी कॉक काही काळ चिंतीत झाला होता. पण सुदैवाने पोलार्डला कोणतीही दुखापत झाली नाही.

दरम्यान त्याआधी चांगली सुरुवात मिळालेला रोहित शर्मा खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोठा फटका खेळताना त्याचा मोहम्मद नबीने झेल टिपला. रोहितने ५ चौकरासह १८ चेंडूत २४ धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या साथीने क्विंटन डी कॉकने मुंबईचा डाव पुढे नेला आणि अर्धशतकी भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने तडाखेबाज खेळी करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचत २३ धावा केल्या. एवीन लुईस उंच फटका खेळताना झेलबाद झाला आणि एका धावेवर माघारी परतला. गेल्या काही सामन्यात तुफान फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज हार्दिक पांड्या बाद झाला. १ चौकार आणि १ षटकार खेचल्यानंतर तो १८ धावांवर झेलबाद झाला.

कायरन पोलार्डकडून मोठ्या फटक्यांची मुंबईकरांना अपेक्षा होती, पण तो १० धावा काढून बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना सलामीवीर डी कॉकने मात्र संयम राखत ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे १० वे IPL अर्धशतक ठरले. क्विंटन डी कॉक याने नाबाद ६९ धावा केल्या. यात खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. खलील अहमदने सर्वाधिक ३ बळी टिपले, तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद नबी यांनी १-१ गडी माघारी धाडला.

या सामन्यासाठी मुंबईच्या संघाने एकही बदल केला नाही. पण हैदराबादच्या संघाने २ बदल केले. मार्टिन गप्टिल याने संघात स्थान देण्यात आले असून डेव्हीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय संदीप शर्माला वगळून बासील थंपी याला संधी देण्यात आली.