IPL 2019 या स्पर्धेचा आजपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना भारताच्या आजी – माजी कर्णधारांच्या संघादरम्यान होणार आहे. महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी लढणार आहे. दरवर्षी होणारा उदघाटन सोहळा यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आले आहे. मात्र या वर्षी सलामीच्या सामन्याआधी मिलेट्री बँडच्या गजरात स्पर्धेची सुरुवात होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये हा बँड आपले वादनकौशल्य दाखवणार आहे.

सशस्त्र सेना दलाला सन्मानित करण्याचा एक कार्यक्रम सामन्याच्या आधी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात BCCI कडून सशस्त्र सेना दलासाठी २० लाख रुपयांचा मदत निधी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाआधी मिलेट्रीचा (लष्कराचा) मद्रास रेजिमेंट बँड येथे वादन करणार आहे. IPL 2019 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होणार असून या स्पर्धेचे साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा कायम गाजावाजा करत पार पडतो. पण या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी होणार खर्च हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. BCCI च्या प्रशासकीय समितीचे (CoA) प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती काही दिवसांपूर्वीच दिली होती.

प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले होते की IPL च्या उदघाटन सोहळ्यामध्ये जेवढा खर्च होतो, तो निधी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा IPL स्पर्धेचा उदघाटन सोहळा होणार नाही.

यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झाले. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी शनिवारी (२४) होणार आहे.