घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा ८० धावांनी पराभव केला. चेन्नईचा कर्णधार एम.एस धोनीला सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या धोनीने २२ चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार खेचत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. सामन्यानंतर बोलताना धोनीने चौथ्या चेंडूवर चोरटी धाव कशी घेतली त्याचा खुलासा केला.

चेन्नईच्या संघाने १९ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या होत्या. मात्र,धोनीच्या चपळतेमुळे चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभा करता आली. २० व्या षटकांतील पहिल्या तीन चेंडूवर फक्त सहा धावा निघाल्या होत्या. धोनी नॉनस्ट्राईकला होता त्यात भर म्हणून चौथ्या चेंडू रायडूला खेळता आला नाही. धोनीने चपळतेने चोरटी धाव घेतली. चेंडू यष्टीरक्षक पंतच्या हातात पोहचला होता. मात्र, हातात ग्लोज असल्यामुळे पंतला थ्रो करता आला नाही. त्यानंतर धोनीने अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावत सन्मानजनक धावसंख्या उभा केली.

सामन्यानंतर यावर बोलताना धोनी म्हणाला की, माझ्या डोक्यात षटकार मारणे एवढच डोक्यात होते. कोणत्याही नवीन फलंदाजाला ते शक्य नसते, रायडू नुकताच मैदानावर आला होता.त्यामुळे मोठे फटके मला मारायचे होते. त्यामुळे स्ट्राइक मला घ्यायची होती. बाकी पंतमुळे मला स्ट्राइक बदलण्यास मदत झाली. पंतने दोन्ही हातात ग्लोज घातले होते. त्यामुळे त्याला लगेच थ्रो करता आला नाही. तेवढ्यात आम्ही धाव घेतली.

क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचे आहे. प्राथमिक (बेसिक) गोष्टी शिकायला हव्यात. त्याच चुका पुन्हा पुन्हा करून आपण आपल्या प्रगतीत आडवे येतो. नेहमी आपल्या चुकीतून शिकले पाहिजे, असेही धोनी म्हणाला.