महेंद्रसिंह धोनी हा सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांना ‘कॅप्टन कूल’ या नावाने परिचीत आहे. मात्र आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात धोनीचं एक वेगळचं रुप त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. धोनीने बाद झाल्यानंतर नो बॉलवरुन झालेल्या वादावरुन थेट डगाऊटमधून मैदानात येत पंचाशी वाद घातला. मात्र धोनीला आता या वादाचे परिणाम भोगावे लागणार असून आयपीएलने या प्रकरणी धोनीवर कारवाई केली आहे. या सामन्यासाठी धोनीला मानधनाच्या ५० टक्के रक्कमच देण्यात येणार असून मैदानात येऊन नियम मोडल्याप्रकरणी त्याचे ५० टक्के मानधन कापले जाणार आहे. यासंदर्भात आयपीएलकडून रात्री उशीरा एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे.

‘जयपूरमधील राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चेन्नई सुपकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सामन्याच्या मानधानापैकी ५० टक्के रक्कमेचा दंड केला जात आहे. आयपीएलच्या नियमावलीप्रमाणे धोनीने लेव्ह दोनमधील २.२० या नियमांमध्ये बसणारी चूक केली असून त्याने ती मान्य केली आहे.’

आयपीएलच्या २.२० नियमामुसार खेळ भावनेला धक्का पोहचवणाऱ्या खेळाडूवर कारवाई करण्यात येते. धोनीला करण्यात आलेला ५० टक्के मानधनाचा दंड हा लेव्ह टू च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिल्यांदा दोषी अढळल्यास करण्यात येणारा कमाल स्वरुपातील दंड आहे. मात्र जारी केलेल्या पत्रकामध्ये धोनीने नक्की कशाप्रकारे या नियमांचे उल्लंघन केले यासंदर्भातील कोणतीही माहिती आयपीएलकडून देण्यात आलेली नाही.

काय झाले नक्की मैदानात

अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता असताना, मधल्या चेंडूवर पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. मात्र यानंतर दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो चेंडू नो-बॉल नसल्याचं जाहीर केलं. यावेळी मैदानात दोन्ही पंचांमध्ये प्रचंड सावळागोंधळ पहायला मिळाला. हा सर्व प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या धोनीचा सर्व संयम गळून पडला आणि त्याने मैदानात येऊन पंचांसोबत राडा केला.

पंच उल्हास गंधे यांनी बेन स्टोक्सने टाकलेला फुलटॉस चेंडू नो-बॉल असल्याचं घोषित केलं. मात्र दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी हा चेंडू नो-बॉल नसल्याचं म्हटलं. मात्र उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा हा सर्वांच्या नजरेस पडला होता, तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचा हा अवतार त्याच्या चाहत्यांसाठी नवीनच होता.

अखेरीस पंचांनी धोनीची समजूत घालून त्याला मैदानाबाहेर पाठवलं. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावा हव्या असताना मिचेल सँटनरने षटकार ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ४ विकेटने सामना जिंकत चेन्नईने आपली विजयी परंपरा कायम राखली. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर धोनीने केलेल्या वर्तनाबद्दल अनेक प्रतिक्रीया येताना पहायला मिळत आहेत. सलामीचे ४ फलंदाज झटपट माघारी परतले असतानाही धोनी आणि रायुडूने अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.