05 June 2020

News Flash

चेन्नईच्या फलंदाजांवर महेंद्रसिंह धोनी नाराज

आम्ही जबाबदारीने खेळलो नाही !

घरच्या मैदानावर खेळत असताना चेन्नई सुपरकिंग्ज संघाला मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे चेन्नईची अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी वाया गेली. विजयासाठी दिलेलं आव्हान मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. पहिल्या सामन्यात पराभव झाला असला तरीही चेन्नईकडे अंतिम फेरीत प्रवेश करण्याची एक संधी कायम आहे. हैदराबाद विरुद्ध दिल्ली यांच्यातील विजेत्याशी चेन्नईला पुन्हा एकदा लढावं लागणार आहे. मात्र मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर धोनी समाधानी नाहीये. त्याने आपली नाराजी बोलून दाखवली.

“कोणालातरी सामन्यात पराभव स्विकारावा लागणार हे सत्य आहे. मात्र काही गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत, विशेषकरुन फलंदाजी. घरच्या मैदानावर आम्ही परिस्थितीशी जुळवून घेणं अपेक्षित आहे. या खेळपट्टीवर आम्ही ६-७ सामने खेळलो आहोत, आणि खेळपट्टीचा अंदाज आम्हाला पहिले यायलाच हवा होता. चेंडू बॅटवर सहज येईल की नाही, खेळपट्टीवर चेंडू उसळी घेईल का या सर्व गोष्टींचा अंदाज आधी आम्हाला यायलाच हवा होता. पण तसं झालं नाही, आम्ही फलंदाजी अधिक जबाबदारीने करायला हवी होती. आमच्या संघाकडे सर्वोत्तम फलंदाजांची फौज आहे. मात्र काहीवेळा ते अनाकलनिय फटके खेळतात आणि विकेट गमावून बसतात. या सर्व खेळाडूंवर मोठी जबाबदारी आहे, खडतर प्रसंगात कसा खेळ करावा याचा त्यांना अनुभव आहे. पण मला आशा आहे की पुढच्या सामन्यात आम्ही चांगला खेळ करु.” धोनीने सामना झाल्यानंतर आपली बाजू स्पष्ट केली.

दरम्यान, आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकार लगावणारा रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरवल्यामुळे रोहितने DRS ची मदत मागितली. त्यात तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांच्या निर्णयालाच दुजोरा दिला. त्यामुळे रोहितला ४ धावांवर माघारी परतावे लागले. स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉकही स्वस्तात बाद झाला. २ चौकारांच्या मदतीने ८ धावा करून तो माघारी परतला. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. मुंबईने दोन गडी स्वस्तात गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवने संयमी खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ईशान किशन बरोबर अर्धशतकी भागीदारीदेखील केली. त्यानंतर आधी खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन आणि पाठोपाठ पहिल्याच चेंडूवर कृणाल पांड्या असे २ चेंडूत इम्रान ताहिरने २ बळी टिपले. ईशान किशनने २८ धावा केल्या. पण सूर्यकुमारने नाबाद ७१ धावा करून मुंबईला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2019 2:26 pm

Web Title: ipl 2019 ms dhoni lashes out at chennai super kings batsmen after 6 wicket defeat to mumbai indians in qualifier 1
टॅग Csk,IPL 2019,Ms Dhoni
Next Stories
1 सर व्हिव्हियन रिचर्ड्स पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतच्या खेळाने प्रभावित
2 पिवळे पक्षी कितीही उंच उडाले तरी, निळ्या आकाशाच्या खालीच राहतात! लाजिरवाण्या पराभवानंतर चेन्नई ‘सुपर’ ट्रोल
3 इम्रान ताहिरचे टी -२० मध्ये त्रिशतक… ठरला हा पराक्रम करणारा सातवा खेळाडू
Just Now!
X