IPL 2019 – सलग ३ सामने जिंकलेल्या हैदराबादचा अश्वमेध मुंबईने त्यांच्याच मैदानावर रोखला. १३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव केवळ ९६ धावांत आटोपला. मुंबईने सामना ४० धावांनी जिंकला आणि आपली विजयी लय कायम राखली. आपला पहिला IPL सामना खेळणारा अल्झारी जोसेफ याने ६ बळी टिपत मुंबईला कठीण वाटणारा विजय मिळवून दिला.

या सामन्यात मलिंगाच्या जागी संधी मिळालेल्या अल्झारी जोसेफ याने १२ धावांत ६ बळी टिपले. याबरोबरच त्याने IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली. या आधी पाकिस्तानचा सोहेल तन्वीर याने राजस्थानकडून खेळताना १४ धावांत ६ बळी टिपले होते. २००८ साली त्याने ही कामगिरी केली होती. मात्र ११ वर्षांनी अखेर अल्झारी जोसेफने त्याचा विक्रम मोडीत काढला. त्याने वॉर्नर, विजय शंकर, हुडा, रशीद खान, भुवनेश्वर कुमार आणि कौल यांचे बळी टिपले.

या आधी अल्झारी जोसेफने खेळाप्रती आपला आदर आणि निष्ठा दाखवून दिली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये विंडीज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु होती. त्यात विंडीजने अँटीग्वा कसोटीत इंग्लंडवर १० गडी राखून मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. या सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. मात्र या सामन्यात विंडीजचा जलदगती गोलंदाज अल्झारी जोसेफने आपल्या खेळाप्रती दाखवलेल्या निष्ठेबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले.

तिसऱ्या दिवसाच्या खेळाआधी अल्झारीला आपल्या आईच्या निधनाची बातमी समजली होती. मात्र हे दुःख विसरुन त्याने संघासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. अल्झारी जोसेफ मैदानात उतरल्यावर मैदानात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उभं राहुन त्याचं कौतुक केलं होतं. विंडीजच्या खेळाडूंनीही आपल्या दंडाला काळी पट्टा बांधून आपल्या सहकाऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. विंडीजचे माजी खेळाडू इयन बिशॉप यांनीही तिसऱ्या दिवशी खेळ सुरु होण्याआधी अल्झारीशी संवाद साधत त्याचं सांत्वन केलं होतं.

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात जोसेफने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. जोसेफने दोन्ही डावात मिळून इंग्लंडचे ४ फलंदाज माघारी धाडले होते.