मुंबई इंडियन्सने टी-20 क्रिकेटमध्ये अनोख्या इतिहासाची नोंद केली आहे. शनिवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हा मुंबईचा 200 वा सामना ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सोमरसेट संघाच्या नावावर याआधी 199 सामने खेळण्याचा विक्रम जमा होता, तो विक्रम मोडत मुंबई इंडियन्सने स्वतःच्या नावावर जमा केला आहे.

सर्वाधिक टी-20 सामने खेळणारे संघ –

मुंबई इंडियन्स – 200
सोमरसेट – 199
हॅम्पशायर – 194
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – 188
ससेक्स/कोलकाता नाईट रायडर्स – 187

याचसोबत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही या सामन्यात पुनरागमन केलं आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा शंभरावा सामना ठरला आहे. रोहितने आयपीएलमध्ये 95, तर चॅम्पियन्स टी-20 स्पर्धेत 5 सामन्यात मुंबईचं नेतृत्व केलं आहे.

दरम्यान, आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या राजस्थानला या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू बेन स्टोक्सला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागले आहे. बेन स्टोक्सच्या जागी संघात इंग्लंडच्या लिएम लिव्हिंगस्टोनला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लिएमने पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 43 चेंडूंत 82 धावा चोपल्या होत्या.