आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर खेळत असताना, चेन्नई सुपरकिंग्जवर ३७ धावांनी मात करत, आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. बाराव्या हंगामातली चेन्नईची विजयी परंपरा खंडीत करण्यातही मुंबईचा संघ यशस्वी झाला. १७१ धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेला चेन्नईचा संघ मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. केदार जाधवचा अपवाद वगळता सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध मुंबईचे सामने नेहमी रंगतदार होत असतात. बुधवारी झालेल्या सामन्यात विजय मिळवत, मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांना चेन्नईच्या विजयी अश्वमेधाला रोखलं आहे.

२०१३ साली, मुंबईने चेन्नईवर ६० धावांनी मात करत सलग ७ सामन्यांच्या विजयाची शृखंला खंडीत केली होती. चेन्नईचा आयपीएलमधला हा सर्वात मोठा पराभव होता. यानंतर २०१८-१९ मध्येही मुंबईनेच पुन्हा एकदा चेन्नईची ६ सामन्यांची विजयी मालिका थांबवली आहे. मुंबईकडून हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगिरी केली.

अवश्य वाचा – Video : आज तुला भेटूनच जाईन ! जेव्हा धोनीसाठी आजीबाई वानखेडे मैदानावर थांबून राहतात

चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजाचा सामना करु शकला नाही. अखेरच्या षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा शंभरावा विजय ठरला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये.

अवश्य वाचा – IPL 2019 : एका षटकात हार्दिकने सामना फिरवला, ब्राव्हो ठरला सर्वात महागडा गोलंदाज