मुंबई : सलग तीन विजयांमुळे मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. आता वानखेडे स्टेडियमवर शनिवारी दुपारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध रंगणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ विजयी सातत्य कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दुखापतीमुळे गेल्या ११ मोसमानंतर प्रथमच इंडियन प्रीमिअर लीगमधील सामन्यातून माघार घेणाऱ्या रोहित शर्माऐवजी मुंबईचे नेतृत्व सांभाळणाऱ्या किरॉन पोलार्डने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला होता. आता पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर पोलार्डचा करिश्मा पाहण्यासाठी मुंबईचे चाहते उत्सुक आहेत.

पोलार्डने पंजाबविरुद्ध ८३ धावांची धुवांधार खेळी साकारत मुंबईला तीन गडी राखून विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने अखेरच्या क्षणी केलेली नाबाद १५ धावांची खेळी मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती. त्याआधीच्या सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात जोसेफने सहा बळी मिळवत मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्यामुळे हे वेस्ट इंडिजचे दोघे खेळाडू शनिवारी होणाऱ्या सामन्यात कशी कामगिरी करतात, यावर मुंबईचे यश अवलंबून असेल.

रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईची फलंदाजी काहीशी कमकुवत झाली आहे. रोहितच्या जागी मुंबईकर सिद्धेश लाडला ‘आयपीएल’मधील पदार्पणाची संधी मिळाली होती. इशान किशन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा आणि भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव यांना आता आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात हातातोंडाशी आलेला विजयाचा घास राजस्थान रॉयल्सने गमावल्यामुळे त्यांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहा सामन्यांतील पाच पराभवांमुळे राजस्थानची तळाच्या सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राजस्थानला बाद फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी या वेगवान गोलंदाजांसह श्रेयस गोपाळ आणि लेग-स्पिनर रियान पराग यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. बेन स्टोक्सच्या अखेरच्या षटकांत चेन्नईने १८ धावा फटकावत विजय साकारला होता. त्यामुळे स्टोक्सलाही गोलंदाजीत अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

*  सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजता

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १

रोहित आज खेळणार

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा दुखापतीतून सावरला असून, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे, असे संघाचे क्रिकेट संचालक झहीर खानने सांगितले. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहित खेळू शकला नव्हता. ‘आयपीएल’मध्ये सलग ११ हंगामांमध्ये खेळल्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे प्रथमच त्याला सामना सोडावा लागला होता.