सनरायजर्स हैदराबाद विजयी सातत्य राखण्यासाठी उत्सुक

हैदराबाद : जॉनी बेअरस्टोच्या सातत्यपूर्ण धावांच्या वर्षांवामुळे सनरायजर्स हैदराबादची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये विजयी घोडदौड सुरू आहे. त्याला तोलामोलाची साथ डेव्हिड वॉर्नरकडून मिळत आहे. यंदाच्या हंगामात कामगिरीमध्ये चढउतार असणाऱ्या मुंबई इंडियन्सला शनिवारी होणाऱ्या लढतीत वॉर्नर-बेअरस्टोचा सामना करताना अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची उणीव तीव्रतेने भासणार आहे.

तीन सलग विजयांच्या बळावर हैदराबादने ‘आयपीएल’ गुणतालिकेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. त्यामुळेच चार सामन्यांपैकी दोन विजय आणि दोन पराभवांमुळे गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असणाऱ्या मुंबईविरुद्ध त्यांचे पारडे जड मानले जात आहे. परंतु मुंबईने मागील सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला नमवण्याची किमया साधली आहे, हेच त्यांच्यासाठी बलस्थान ठरू शकेल. चेन्नईचा हा चार सामन्यांमधील एकमेव पराभव ठरला.

हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सलामीची लढत गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटन्स यांना हरवले. गुरुवारी झालेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कर्णधार केन विल्यम्सन खेळू शकला नव्हता. परंतु त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या कामगिरीवर जाणवला नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आघाडीवर राहून नेतृत्व केले. मोहम्मद नबी आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत दिल्लीला ८ बाद १२९ धावसंख्येवर मर्यादित ठेवले. सलामीवीर बेअरस्टोने (४८) पुन्हा चमकदार कामगिरी केल्यामुळे हैदराबादने पाच गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरसुद्धा दिमाखदार कामगिरी करीत आहे. कोलकाताविरुद्ध ११८ धावांची सलामी दिल्यानंतर वॉर्नर-बेअरस्टो जोडीचे वर्चस्व सुरू असून, त्यांनी राजस्थान आणि बेंगळुरुविरुद्ध अनुक्रमे ११० आणि १८५ धावांच्या भागीदाऱ्या केल्या आहेत.

हैदराबादकडे भुवनेश्वर वगळता नबी आणि रशीद खान हा अफगाणिस्तानचा फिरकी मारा आहे. त्यामुळे रोहित शर्मा, युवराज सिंग, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड आणि पंडय़ा बंधू (कृणाल आणि हार्दिक) यांच्यासाठी धावा काढणे आव्हानात्मक ठरणार आहे.

मुंबईकडे उत्तम फलंदाजीची फळी आहे. मात्र ते अद्याप क्षमतेनुसार कामगिरी करू शकलेले नाहीत. चेन्नईविरुद्ध सूर्यकुमार (५९), कृणाल (४२) यांनी मुंबईला १७० धावसंख्या उभारून दिली. मग प्रतिस्पध्र्याना ८ बाद १३३ धावसंख्येपर्यंत सीमित ठेवले.

संघ

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेरिस्टो, रिद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, बेन कटिंग, पंकज जैस्वाल, इशान किशन (यष्टिरक्षक), सिद्धेश लाड, एव्हिन लेविस, मयांक मरकडे, मिचेल मॅक्क्लिनॅघन, अल्झारी जोसेफ, हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड, अनुकूल रॉय, रसिक सलाम, युवराज सिंग, अनमोलप्रीत सिंग, बिरदर शरण, आदित्य तरे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी’कॉक (यष्टिरक्षक.)

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १