२०१९ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने आपल्या खेळाडूंसमोर अटी ठेवल्याचं समजतं आहे. आगामी वर्षात इंग्लंडमध्ये विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, यासाठी आयपीएल २९ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. मात्र आगामी विश्वचषक लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने आपले खेळाडू संपूर्ण हंगाम आयपीएल खेळणार नाहीत असं जाहीर केलं होतं. मात्र जागतिक क्रिकेटमध्ये आयपीएलला असणारं स्थान, लिलावातून खेळाडूंना मिळणारे पैसे यामुळे अनेक परदेशी खेळाडू स्थानिक क्रिकेटला बगल देत आयपीएल खेळणं पसतं करतात. यासाठी आगामी आयपीएलमध्ये सहभागी व्हायचं असल्याच क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने आपल्या खेळाडूंसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायचं आहे, त्यांनी आपल्या स्थानिक संघाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं आहे. विश्वचषकामुळे आयपीएलचं आयोजन अपेक्षेपेक्षा आधी होत असल्याने आयोजनाच्या दृष्टीने हा थोडा कठीण काळ असणार आहे. यामुळे आमच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांवरही याचा परिणाम होईल. आम्ही आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सरसकट परवानगी देत नाही, प्रत्येक खेळाडूच्या अर्जावर वेगळा विचार केला जातो. त्यामुळे भविष्यकाळात गैरसमज टाळण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही भूमिका घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या Team Performance Manager बेलिंडा क्लार्क यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना ही माहिती दिली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, शेफिल्ड शिल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतरच खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल. याचसोबत आगामी विश्वचषक व इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिकेसाठी गरज पडल्यास खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये परतावं लागणार आहे. २३ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघाची घोषणा करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकाचा माजी विजेता आहे, त्यामुळे आगामी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.