IPL 2019 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचे बाराव्या हंगामाच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा कायम गाजावाजा करत पार पडतो. पण या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी होणार खर्च हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. BCCI च्या प्रशासकीय समितीचे (CoA) प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली.

प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले की IPL च्या उदघाटन सोहळ्यामध्ये जेवढा खर्च होतो, तो निधी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा IPL स्पर्धेचा उदघाटन सोहळा होणार नाही.

यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झाले. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी शनिवारी (२४) होणार आहे.