आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मात्र नवोदीत रियान परागने या हंगामात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रियान परागने एकतर्फी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. या खेळीसोबत रियान पराग आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

वयाच्या १७ वर्ष १७५ व्या दिवशी रियान परागने आयपीएलमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे. रियानच्या आधी संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांच्या नावावर हा विक्रम संयुक्तपणे नोंदवला होता. दोन्ही खेळाडूंनी वयाच्या १८ व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. याआधीही स्पर्धेत दोनदा रियानला हा विक्रम मोडण्याची संधी आली होती, मात्र दुर्दैवाने तो बाद झाला. मात्र दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रियानने संधीचं सोनं करत अखेर हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. त्याने ४९ चेंडूत ५० धावांची संयमी खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

दरम्यान, रियानच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने सामन्यात ११६ धावांपर्यंत मजल मारली.