22 January 2021

News Flash

राजस्थानची चेन्नईसमोर अग्निपरीक्षा!

चार पराभवांनंतर यजमानांना घरच्या मैदानावर विजयी मार्गावर परतण्याचे वेध

| April 11, 2019 12:50 am

चार पराभवांनंतर यजमानांना घरच्या मैदानावर विजयी मार्गावर परतण्याचे वेध

जयपूर : तगडय़ा खेळाडूंचा समावेश असला तरी राजस्थान रॉयल्सची विजय मिळवण्यासाठी पुरती दमछाक झाली आहे. पाच सामन्यांत अवघा एक विजय गाठीशी असताना आता राजस्थानला घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढय़ संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. चेन्नईने सहा सामन्यांत पाच विजय मिळवून अग्रस्थानी झेप घेतल्यामुळे सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात राजस्थानची चेन्नईसमोर अग्निपरीक्षा असणार आहे.

राजस्थानची चार पराभवांमुळे सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर एकमेव विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आता घरच्या मैदानाचा फायदा उठवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्याउलट, चेन्नईने मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सला सात गडी राखून धूळ चारत अग्रस्थानी झेप घेतली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ विजयाच्या वाटेवर स्वार झाला असून कोणत्याही खेळपट्टीवर कोणत्याही वातावरणात विजय मिळवण्याची क्षमता त्यांच्या संघात आहे.

राजस्थानला मात्र आपल्या क्षमतेनुसार खेळ करता आलेला नाही. आता इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या पर्वातील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगल्या परिस्थितीत असतानाही राजस्थानला संधीचा फायदा उठवता आला नाही. कोलकाताविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थानने सुमार खेळ केला. याच सामन्यात संजू सॅमसनने यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते. सॅमसन सध्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे त्याची उणीव राजस्थानला जाणवणार आहे. जोस बटलरही गेल्या काही सामन्यांत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही.

कर्णधार अजिंक्य रहाणे, राहुल त्रिपाठी आणि बेन स्टोक्स हेसुद्धा फलंदाजीत अपयशी ठरले आहेत. या सर्व समस्यांवर तोडगा काढून राजस्थानला आपला खेळ उंचवावा लागणार आहे. गोलंदाजीतही स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट आणि धवल कुलकर्णी छाप पाडू शकलेले नाहीत.

दुसरीकडे, लागोपाठच्या विजयांमुळे चेन्नईचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. याआधी राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यांत धोनीने साकारलेल्या नाबाद ७५ धावांच्या खेळीमुळे चेन्नईने आठ धावांनी विजय मिळवला होता. चेन्नईची फलंदाजी तगडी वाटत असून शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केदार जाधव आणि धोनी हे चेन्नईसाठी धावून येत आहेत. हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर या फिरकीपटूंनी चेन्नईच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज दीपक चहर हासुद्धा चेन्नईसाठी भरीव कामगिरी करत आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १

संघ : राजस्थान रॉयल्स

अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेश मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोरमोर, आर्यमन बिरला, रियान पराग, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, मनन वोहरा, राहुल त्रिपाठी.

चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रूव शोरे, चैतन्य बिश्णोई, रितूराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सान्तनेर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कुगेलेईन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:50 am

Web Title: ipl 2019 rajasthan royals vs chennai super kings match preview
टॅग IPL 2019
Next Stories
1 हरभजन आणि ताहिर मुरलेल्या वाइनसारखे -धोनी
2 सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम चहरच्या नावावर
3 सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, सायना दुसऱ्या फेरीत
Just Now!
X