IPL 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या स्वैर माऱ्याच्या जोरावर कोलकात्याविरुद्ध बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. आंद्रे रसेलने फटकेबाजी करत एका क्षणाला अशक्यप्राय वाटणारे २०६ धावांचे आव्हान संघाला सहज पूर्ण करुन दिले. ५ गडी राखून सामना जिंकत कोलकात्याने बंगळुरुच्या प्रयत्नावर पुन्हा एकदा पाणी फिरवले. यामुळे भडकलेल्या कर्णधार विराट कोहलीने बंगळुरूच्या पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडले.

शेवटच्या ४ षटकात कोलकाताला विजयासाठी ६६ धावांची आवश्यकता होती. आंद्रे रसेलने १३ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ४८ धावा चोपले. त्यामुळे विराट गोलंदाजांवर प्रचंड भडकला. तो म्हणाला की अखेरच्या ४ षटकात आम्ही ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, त्यानुसार आम्ही पराभूत होणेच अपेक्षित होते. निर्णायक क्षणी जर गोलंदाजांनी भेदक मारा केला नाही, तर रसलसारखे ‘पॉवर हिटर’ गोलंदाजांचा असाच समाचार घेतात. दडपणाखाली आमचे गोलंदाज दबले गेले आणि आम्ही पराभूत झालो, हीच खरी गोष्ट आहे.

आम्ही आणखी २० ते २५ धावा केल्या असत्या, तर कदाचित आम्हाला त्या फायद्याच्या ठरल्या असत्या. पण तुम्ही शेवटच्या ४ षटकात ७५ धावांचादेखील बचाव करू शकत नसाल, तर १०० धावांचा बचाव तरी करू शकाल? हे कसे काय निश्चितपणे सांगता येईल. गोलंदाजांचा मारा अत्यंत खराब ठरला. आम्ही कोठे काय चुकले यावर थोडी चर्चा केली, पण त्याशिवाय आम्ही काहीच करू शकलो नाही. आतापर्यंत आमचा हा हंगाम अत्यंत वाईट गेला आहे, पण आम्ही पुनरागमन करू असा मला विश्वास आहे, असेही कोहली शेवटी म्हणाला.

दरम्यान, सलग चार पराभव पदरी पडल्यानंतर बंगळुरुच्या संघाने कोलकात्याविरुद्ध सामन्यात आपल्या कामगिरीमध्ये चांगली सुधारणा केली. नवदीप सैनीने सुनिल नरिनला बाद करत कोलकात्याला पहिला धक्का दिला. यानंतर ख्रिल लिन, रॉबिन उथप्पा जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. या दोन्ही कोलकात्याच्या डावाला आकार दिला. मात्र रॉबिन उथप्पा माघारी परतल्यानंतर कोलकात्याचा एक-एक फलंदाज हजेरी लावून माघारी परतले. मात्र अखेरच्या षटकात आंद्रे रसेल आणि शुभमन गिल जोडीने फटकेबाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. बंगळुरुकडून पवन नेगी आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2-2 तर युझवेंद्र चहलने 1 बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला बाराव्या हंगामात अखेरीस सूर सापडला. घरच्या मैदानावर खेळत असताना, बंगळुरुने आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर 205 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने 84 धावांची खेळी केली. त्याला सलामीवीर पार्थिव पटेल आणि एबी डिव्हीलियर्सनेही चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय चुकला. पार्थिव पटेल आणि विराट कोहली यांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेत, पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. अखेरीस नितीश राणाने पार्थिवला माघारी धाडत बंगळुरुला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर विराटने डिव्हीलियर्सच्या साथीने फटकेबाजी सुरुच ठेवली.

काही वेळाने डिव्हीलियर्सनेही आपल्या जुन्या रंगात येत कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराटपाठोपाठ डिव्हीलियर्सनेही आपलं अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिव्हीलियर्सही सुनिल नरीनचा शिकार बनला. त्याने 32 चेंडूत 63 धावा केल्या. कोलकात्याकडून सुनिल नरीन, नितीश राणा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.