28 September 2020

News Flash

IPL 2019 : चहलचा पराक्रम! केलं अनोखं शतक

युझवेंद्र चहलने गाठला IPL मधील एक महत्त्वाचा टप्पा

IPL 2019 RCB vs SRH : यंदाच्या हंगामात अत्यंत खराब सुरुवात केलेल्या बंगळुरूने हंगामाचा अखेर विजयाने केला. शिमरॉन हेटमायर (७५) आणि गुरकीरत सिंग (६५) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफ्स फेरीत पोहोचण्याची वाट बिकट झाली असून त्यांना रविवारच्या २ सामन्यांच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावगतीवर चांगलाच अंकुश लावला होता. वृद्धीमान साहा (२०) आणि मार्टीन गप्टील (३०) जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. साहा माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. शंकर (२७) माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला पुन्हा गळती लागली. एकीकडे फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद ७० धावा केल्या.

या सामन्यात बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ तर नवदीप सैनीने २ बळी टिपले. युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांना केवळ १-१ बळी टिपता आला. पण या बरोबरच चहल याने IPL मधील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. चहलने या सामन्यात १०० वा IPL बळी टिपला. त्याने युसूफ पठाणला ३ धावांवर माघारी पाठवले.

त्यांनतर १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याने केवळ १६ धावा केल्या. पण त्यातही त्याने २ विक्रम रचले. या १६ धावांच्या खेळीच्या जोरावर त्याने IPL मध्ये कर्णधार म्हणून ४ हजार धावांचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा तो महेंद्रसिंग धोनीनंतरचा पहिलाच खेळाडू ठरला. धोनीने IPL मध्ये कर्णधार म्हणून ४ हजार ८४ धावा केल्या आहेत.

याशिवाय एकाच संघाविरुद्ध ५०० हून जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तोही दुसरा खेळाडू ठरला. विराटच्या नावावर हैदराबाद विरुद्ध ५०४ धावा आहेत. १३ डावांमध्ये त्याने ४ अर्धशतके ठोकत ही कामगिरी केली आहे. या यादीत शेन वॉटसन हा अव्वल आहे. त्याच्या नावावर IPL मध्ये एका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक ५२३ धावा (१६ डाव) आहेत.

शनिवारच्या सामन्यात कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली. विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले. गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी IPL इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. हेटमायरने ४७ चेंडूत ७५ धावा केल्या तर गुरकिरतने ४७ चेंडूत ६५ धावा केल्या. त्यानंतर अंतिम टप्प्यात फटकेबाजी हे दोघेही बाद झाले. त्यामुळे काही काळ सामन्यात रंगत आली, पण अखेर शेवटच्या षटकात २ चौकार खेचत उमेश यादवने बंगळुरूला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 3:57 pm

Web Title: ipl 2019 rcb spinner yuzvendra chahal 100 ipl wickets mark
टॅग IPL 2019
Next Stories
1 अखेरच्या सामन्यात पंजाबची चेन्नईवर मात, लोकेश राहुलचं आक्रमक अर्धशतक
2 IPL 2019 : सेहवागला मागे टाकून ऋषभ पंत ठरला षटकारांचा बादशहा
3 IPL 2019 : फक्त १६ धावा… तरीही विराटचा विक्रमांचा ‘डबल धमाका’
Just Now!
X