IPL 2019 RCB vs CSK : अंतिम चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने चेन्नईला एका धावेने पराभूत केले. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या २६ धावांचा पाठलाग करताना धोनीने ५ चेंडूत २४ धावा फटकावल्या. पण अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला चपळाईने बाद केले.

एकीकडे गडी बाद होत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अत्यंत शांत आणि संयमी खेळी केली. त्याने सुरुवातीला मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केली, तर भेदक मारा करणारे चेंडू खेळून काढले. पण शेवटच्या टप्प्यात मात्र त्याने आपली लय दाखवून दिला आणि ४८ चेंडूत ८४ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

VIDEO : अबब! धोनीने थेट स्टेडियमबाहेर मारलेला षटकार पाहिलात का?

याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की धोनीने जी खेळी केली, ती खेळी धडकी भरवणारी होती. १९ व्या षटकापर्यंत आम्ही उत्तम गोलंदाजी केली असे मला वाटते पण शेवटच्या षटकात धोनीने तेच केले, ज्या गोष्टीत तो प्रवीण आहे. त्याच्या त्या पद्धतीच्या वादळी खेळीमुळे आम्ही एका क्षणी घाबरलो होतो.

धोनीच्या नावावर सात विराट विक्रम

 

चेंडू बॅटवर नीट येत नव्हता. पार्थिव पटेल आणि एबी डीव्हिलियर्स यांनी उत्तम सुरुवात केली. पण डीव्हिलियर्स बाद झाला. पाठोपाठ झटपट आणखी दोन गडी बाद झाले. त्यामुळे आम्ही अंतिम धावसंख्येत १५ धावा कमी केल्याचे आम्हाला जाणवले. मोईन अलीने फलंदाजीसाठी क्रमवारीत वर यायला हवे होते. नवदीप सैनीने आपल्या कामगिरीत सुधारणा केली असून त्याने चांगली कामगिरी केली. पार्थिव पटेलच्या विचारशक्तीचीही दाद द्यायला हवी, कारण हा सामना निर्णायक क्षणी असताना त्याने परिस्थिती ओळखत अचूक धावबाद केले, असेही कोहली म्हणाला.

दरम्यान, दरम्यान, १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली.आधी वॉटसन ५ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर स्टेनने रैनाचा (०) त्रिफळा उडवला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस मोठा फटका खेळण्यासाठी सरसावला, पण तो फटका चुकला आणि डु प्लेसिस ५ धावांवर माघारी परतला. डु प्लेसिस सारखाच फटका खेळून केदार जाधवही तंबूत परतला आणि चेन्नईला २८ या धावसंख्येवर चौथा धक्का बसला. केदारने ९ धावा केल्या. धोनीने अप्रतिम फटकेबाजी केली, पण अखेर एका धावेने हा सामना बंगळुरूने जिंकला.

 

चार गडी झटपट बाद झाल्यानंतर अंबाती रायडूने धोनीच्या साथीने डाव सावरला, पण विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी त्याने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला. त्यातच २ चौकार आणि १ षटकार लगावून तो २९ धावांवर माघारी परतला. या दोघांनी मिळून ५५ धावांची भागीदारी केली. धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात भागीदारी होत असतानाच जाडेजा धावचीत झाला आणि चेन्नईला सहावा धक्का बसला. जाडेजाने ११ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक बाजू लावून धरली. ३५ चेंडूत त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. निर्णायक क्षणी ब्राव्हो झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या.

IPL 2019 : बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार पार्थिव पटेल धोनीच्या खेळीबद्दल म्हणतो…

त्याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या फलंदाजांनी निराशा केली. मात्र पार्थिव पटेल आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी संयम राखत फटकेबाजी करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. त्याने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात चेन्नईचे गोलंदाज यशस्वी ठरले. दिपक चहरने कोहलीला माघारी धाडलं. यानंतर एबी डिव्हीलियर्स, अक्षदीप नाथ, स्टॉयनिस यांनी थोड्या-थोड्या कालावधीसाठी पार्थिव पटेलला चांगली साथ दिली. मात्र मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले. चेन्नईकडून दिपक चहर-शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने एका फलंदाजाला बाद केलं.