कर्णधार श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरु बुल्सवर ४ गडी राखून मात केली आहे. यासोबत बंगळुरुचा या हंगामातला हा सलग सहावा पराभव ठरला आहे. १५० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश लावणं बंगळुरुच्या गोलंदाजांना जमलं नाही. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दिल्लीचा आजच्या सामन्यातला विजय आणखीनच सोपा झाला. श्रेयस अय्यरने ६७ धावांची खेळी केली.

सलामीवीर शिखर धवनला शून्यावर बाद करत दिल्लीने आजच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली होती. मात्र यानंतर सामन्यावर पकड घेणं त्यांना जमलंच नाही. श्रेयस अय्यरने आश्वासक खेळी करत आपला संघ संकटात सापडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्याला पृथ्वी शॉ, कॉलिन इन्ग्राम आणि ऋषभ पंत यांनी छोटेखानी फटकेबाजी खेळी करत चांगली साथ दिली. बंगळुरुकडून नवदीप सैनीने २ तर मोईन अली, टीम साऊदी, मोहम्मद सिराज आणि पवन नेगी यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.

त्याआधी, दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ घरच्या मैदानावर पुन्हा एकदा अडखळला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुला १४९ धावांवर रोखलं. बंगळुरुच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी केली खरी, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमवणं त्यांना जमलं नाही. दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांवर अंकुश लावला.

बंगळुरुच्या डावाची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एबी डिव्हीलियर्स, मार्कस स्टॉयनिस ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मोईन अलीच्या साथीने विराट कोहलीने फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. मात्र कगिसो रबाडाने एकाच षटकात ३ फलंदाजांना माघारी धाडत बंगळुरुला पुन्हा धक्का दिला. अखेरीस बंगळुरुला १४९ धावांपर्यंत मजल मारला आली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४, ख्रिस मॉरिसने २ बळी घेतले. त्यांना अक्षर पटेल आणि संदीप लामिच्छानेने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

Live Blog

19:22 (IST)07 Apr 2019
अखेर दिल्ली सामन्यात विजयी

बंगळुरुवर ४ गडी राखून केली मात, बंगळुरुचा सलग सहावा पराभव

19:18 (IST)07 Apr 2019
अखेरच्या षटकांत दिल्लीच्या डावाला गळती

श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस आणि ऋषभ पंत ठराविक अंतराने माघारी

18:53 (IST)07 Apr 2019
कर्णधार श्रेयस अय्यरचं अर्धशतक

दिल्लीचं पारडं सामन्यात अजुनही जड

18:53 (IST)07 Apr 2019
दिल्लीला तिसरा धक्का, इन्ग्राम माघारी

मोईन अलीने घेतला बळी

18:47 (IST)07 Apr 2019
दिल्लीचा दुसरा गडी माघारी, पृथ्वी शॉ बाद

पवन नेगीने घेतला बळी

18:47 (IST)07 Apr 2019
श्रेयस अय्यर - पृथ्वी शॉ जोडीची भागीदारी

दिल्लीचा डाव सावरला

17:58 (IST)07 Apr 2019
दिल्लीला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

टीम साऊदीने घेतला बळी

17:46 (IST)07 Apr 2019
दिल्लीला विजयासाठी १५० धावांचं आव्हान

बंगळुरुची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली

17:35 (IST)07 Apr 2019
मोहम्मद सिराज माघारी, बंगळुरुला आठवा धक्का

ख्रिस मॉरिसने घेतला बळी

17:28 (IST)07 Apr 2019
कगिसो रबाडाचे एकाच षटकात बंगळुरुला ३ धक्के

अक्षदीप नाथ, पवन नेगी आणि विराट कोहली माघारी

17:14 (IST)07 Apr 2019
मोईन अली माघारी, बंगळुरुला चौथा धक्का

संदीप लामिच्छानेच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ऋषभ पंतने केलं अलीला यष्टीचीत

16:53 (IST)07 Apr 2019
स्टॉयनिस माघारी, बंगळुरुला तिसरा धक्का

अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्टॉयनिस बाद

16:33 (IST)07 Apr 2019
डिव्हीलियर्स माघारी, बंगळुरुचा दुसरा गडी माघारी

कगिसो रबाडाने घेतला बळी

16:12 (IST)07 Apr 2019
बंगळुरुला पहिला धक्का, पार्थिव पटेल माघारी

ख्रिस मॉरिसने घेतला पार्थिवचा बळी

15:48 (IST)07 Apr 2019
दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

दोन्ही संघांमध्ये कोणतेही बदल नाहीत