2018 साली टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या कसोटी मालिकेदरम्यान ऋषभ पंत आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यांच्यातला संघर्ष चांगलाच गाजला होता. टीम पेनने ऋषभ पंतला आपल्या मुलांचं बेबीसिटींग करशील असं विचारुन द्वंद्वाला तोंड फोडलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर हा वाद थोड्यावेळासाठी थांबला असला तरीही पंतच्या पाठीमागे लागलेलं ‘बेबीसीटर’ हे बिरुद त्याची पाठ सोडत नाहीये. शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही पंत बेबी सीटिंग करताना पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सचा हा खेळाडू शिखर धवनचा मुलगा झोरावर याच्यासोबत खेळताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बेबीसीटर म्हणून व्हायरल होत आहे.

दरम्यान, शिखर धवन आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सला परतीच्या लढतीतही दिल्लीला नमवता आले नाही. विजयासाठीचे 179 धावांचे लक्ष्य दिल्लीने 7 विकेट राखून पार केले. धवनने 63 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 97 धावा केल्या. आयपीएलमधील पहिल्या शतकापासून त्याला वंचित रहावे लागले. सामना संपल्यानंतर पंत झोरावरसोबत खेळताना दिसला.

धवन व रिषभ पंत या जोडीने दिल्लीला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर दिल्लीने 15 षटकांत 2 बाद 138 धावा केलेल्या. पंतला 46 धावांवर नितीश राणाने माघारी पाठवले, परंतु तोपर्यंत कोलकाताच्या हातून सामना निसटला होता. धवनच्या नाबाद 97 धावांनी दिल्लीचा विजय पक्का केला.