आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्ले-ऑफच्या गटात दाखल होण्याचा मान मिळवला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने बंगळुरुवर १६ धावांनी मात केली. बंगळुरुच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना चांगली टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी बाजी मारत दिल्लीने आपलं प्ले-ऑफमधलं स्थान पक्क केलं आहे. बंगळुरुचा संघ १७१ धावांपर्यंत मजल मारु शकला. या विजयात दिल्लीचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपल्या नावावर एका अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळी घेणारा यष्टीरक्षक ठरण्याचा बहुमान ऋषभ पंतच्या नावावर जमा झाला आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामात ऋषभ पंतच्या नावावर २० बळी (१५ झेल, ५ यष्टीचीत) जमा झाले आहेत. रविवारी बंगळुरुविरोधात ऋषभने यष्टींमागे दोन झेल घेतले. या कामगिरीसह ऋषभने कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढला आहे. २०११ साली कुमार संगकाराने यष्टींमागे १९ (१७ झेल, २ यष्टीचीत) बळी घेतले होते.

विराट कोहली-पार्थिव पटेल जोडीने आक्रमक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवत दिल्लीवर दबाव आणला, मात्र रबाडाने पटेलला माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शिवम दुबे, हेन्रिच क्लासेन हे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकात गुरकिरत मान आणि मार्कस स्टॉयनीस जोडीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. दिल्लीकडून अमित मिश्रा आणि कगिसो रबाडाने २ तर इशांत शर्मा, अक्षर पटेल, शेरफन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.