IPL २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सने पहिला सामना दिल्लीविरुद्ध वानखेडे मैदानावर खेळला. या सामन्यात मुंबईला ३७ धावांनी हार पत्करावी लागली. पण या सामन्याआधी रोहित शर्मा एका खास आणि वेगळ्या कारणासाठी चर्चेत होता. त्या चर्चेचे कारण म्हणजे रोहितने आपली चिमुकली बेबी समायरासाठी म्हटलेलं ‘गली बॉय’ चित्रपटातील रॅप सॉंग.. रणवीर सिंगचा गली बॉय हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्या चित्रपटातील गाणी हिट झाली आहेत. त्यात रणवीर सिंगने म्हटलेलं रॅप सॉंग साऱ्यांना खूप आवडत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मादेखील याच रॅप साँगचा फॅन झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रोहितला मुलीला काही वेळ देता आला. त्याने आपल्या मुलीबरोबरच्या काही छानशा आठवणी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्यातच शनिवारी रोहितनं समायरा सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात चक्क रोहित समायरासाठी रॅप साँग गाताना दिसला. रोहितनं पोस्ट केलेला हा व्हिडीओ नेटिझन्सने डोक्यावर उचलून घेतला.

पहा हा व्हिडीओ –

हा व्हिडीओ पाहून बीग बी अमिताभ बच्चन यांनाही कमेंट करण्यावाचून राहवलं नाही. ते स्वतः एका लहान मुलीचे आजोबा असल्याने त्यांनादेखील हा व्हिडीओ आणि रोहितचा आपल्या चिमुकलीचा केलेला प्रयत्न खूप आवडला आणि त्यांनी त्या व्हिडीओवर ‘खूपच क्युट’ अशी कमेंट केली.

दरम्यान, मुंबईकडून युवराज सिंह आणि कृणाल पांड्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. युवराजने अखेरपर्यंत आपली झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावलं. त्याला कृणाल पांड्यानेही चांगली साथ दिली. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांपुढे त्याची डाळ शिजू शकली नाही. सलामीवीर रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे मुंबईला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. यानंतर युवराजने मधल्या काही षटकांमध्ये संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि कगिसो रबाडाने 2, तर ट्रेंट बोल्ट-तेवतिया-केमो पॉल-अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतला होता. पण त्याचा हा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर पृथ्वी शॉ (७) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१६) झटपट माघारी परतले. पण दुसरा सलामीवीर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत दिल्लीला बळ दिले. या भागीदारीने दिल्लीचा डाव सावरला गेला. पण दोघेही आपल्या अर्धशतकाला मुकले. पण त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने तुफान धुलाई केली. पंतने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, बेन कटिंग, रसिख सलाम या वेगवेना माऱ्याला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. ऋषभने नाबाद ७८ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे ही धावसंख्या त्याने केवळ २७ चेंडूत उभारली. ७८ धावांच्या नाबाद खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याच्या या खेळाचे मुंबई इंडियन्सच्या संघाकडूनही कौतुक झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 rohit sharma daughter baby samaira rap song gully boy video amitabh bachchan
First published on: 25-03-2019 at 18:39 IST