मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर खेळत असताना, राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी दिलेलं 188 धावांचं आव्हान राजस्थानने जोस बटलरच्या साथीने सहज पूर्ण केलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पुनरागमन करत आश्वासक खेळी केली. रोहितचं फॉर्मात येणं हा मुंबईसाठी आजच्या सामन्यात एक आश्वासक मुद्दा होता. राजस्थानने 4 गडी राखून मुंबईवर मात करत हंगामातला आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्माने फलंदाजीदरम्यान आपली चतुराई दाखवत सर्वांची वाहवा मिळवली.

अवश्य वाचा – IPL 2019 : नाकारलेल्या खेळाडूंनीच पाजलं मुंबईला पराभवाचं पाणी

दहाव्या षटकात कृष्णप्पा गौथमच्या गोलंदाजीवर रोहित 44 धावांवर खेळत होता. मुंबईचा एकही गडी बाद झालेला नसल्यामुळे रोहितला माघारी धाडण्यासाठी कृष्णप्पा गौथमने लेग साईडला बॉल टाकत, रोहितला स्टम्पिंग करण्याची संधी निर्माण केली. यष्टीरक्षक संजू सॅमसन या संधीसाठी पुढे सरसावलाही होता. मात्र अनुभवी रोहितला गौथमची ही युक्ती लगेच कळली आणि त्याने पायाने चेंडूची दिशा बदलत आपली विकेट घेण्याचा प्लान हाणून पाडला. या घटनेनंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर काहीकाळासाठी हास्य पसरलं होतं. रोहितच्या या चतुराईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दरम्यान, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंजांचा नेटाने सामना करत दोन्ही फलंदाजांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेचा अडसर दूर केल्यानंतर बटलरने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. बटलरने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. राजस्थानचा संघ विजयाच्या जवळ आलेला असतानाच, सॅमसन, बटलर, राहुल त्रिपाठी, लिव्हींगस्टोन, स्मिथ हे फलंदाज माघारी परतले. यामुळे राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं होतं. मात्र तळातल्या फलंदाजांनी राजस्थानचा विजय सुनिश्चीत केला.