चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या ‘क्वालिफायर-१’ सामन्यांत विजय मिळवून देणारी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

चेपॉकच्या धिम्या गतीच्या खेळपट्टीवर सूर्यकुमारने नाबाद ७१ धावांची खेळी साकारत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. ‘‘सूर्यकुमार यादव हा फिरकीपटूंविरोधात आमचा सर्वोत्तम फलंदाज आहे. चेन्नईचे फिरकीपटू हाच आमच्या मार्गातील प्रमुख अडसर असल्याचे सूर्यकुमारला माहीत होते. सूर्यकुमार फिरकीपटूंसमोर चांगली कामगिरी करतो, हे मला माहीत होते. त्याने चांगली खेळी करत आम्हाला संकटातून बाहेर काढले,’’ असे रोहितने सांगितले.

‘‘चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान खेळपट्टीचा रागरंग पाहिल्यानंतर मी जमिनीलगतचे फटके मारण्यावर भर दिला. फलंदाजांना हवेत फटके लगावणे जमत नसल्याचे मी पहिल्या डावादरम्यान पाहिले होते. त्यामुळे एकेरी, दुहेरी धावा काढून मी संघाचा धावफलक हलता ठेवला,’’ असे सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा सूर्यकुमार म्हणाला.

फिरकीपटूंची स्तुती करताना रोहित म्हणाला की, ‘‘जयंत यादव, कृणाल पंडय़ा आणि राहुल चहर यांनी ११ षटकांत ४ गडय़ांच्या मोबदल्यात अवघ्या ६० धावा दिल्याने सामना आमच्या पारडय़ात झुकला. चेन्नईला कमीत कमी धावांमध्ये गुंडाळणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. मुंबईच्या फिरकीपटूंनी ते करून दाखवले. त्यामुळेच जयंत यादवला संधी देण्याचा आमचा निर्णय अचूक ठरला.’’