IPL 2019 RR vs CSK : चेन्नई सुपरकिंग्जने अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर ४ गडी राखून मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेले १५२ धावांचे आव्हान चेन्नईने अखेरच्या षटकात पूर्ण करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी खेळी केल्या. तर मिचेल सँटनरने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत सामना जिंकवून दिला.

या सामन्यात चाहत्यांना धोनीच्या फटकेबाजीचा अनुभव घेता आला. सामन्यात दुसरा डाव सुरु असताना राजस्थानच्या सर्व गोलंदाजांनी आज टिच्चून मारा केला. मराठमोळ्या धवल कुलकर्णीने पहिल्याच षटकात शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत राजस्थानला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी (९५) भागीदारी रचली. धोनीने ४३ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार खेचले. धोनीची ही खेळी पाहून चक्क स्टेडियमध्ये असलेल्या चाहत्याने आधी राजस्थानचा शर्ट घातला असताना त्यावरच धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचा शर्ट चढवला आणि चेन्नईला पाठिंबा दर्शवला.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, अखेरच्या षटकांत रायुडू-धोनी माघारी परतल्यामुळे सामना दोलायमान झाला होता. त्यातच, अखेरच्या षटकात पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण अखेरीस चेन्नईच्या तळातल्या फलंदाजांनी विजयासाठीचं आव्हान पूर्ण करत राजस्थानवर मात केली. राजस्थानकडून धवल कुलकर्णी, बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. चेन्नईचा एक फलंदाज धावबाद झाला.

त्याआधी,चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यजमान राजस्थान रॉयल्सला 151 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा महेंद्रसिंह धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर जोडीने राजस्थानला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र दिपक चहरने रहाणेला माघारी धाडत राजस्थानला पहिला धक्का दिला. यानंतर राजस्थानच्या डावाला गळतीच लागली.

दिपक चहर, शार्दुल ठाकूर, रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर यांनी ठराविक अंतराने राजस्थानच्या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडणं सुरु ठेवलं. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, स्टिव्ह स्मिथ यांच्याकडून राजस्थानला अपेक्षा होत्या, मात्र ते सपशेल फोल ठरले. अखेरच्या फळीत बेन स्टोक्सने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दिपक चहरने त्याचा त्रिफळा उडवला. अखेरच्या षटकात श्रेयस गोपाळ आणि जोफ्रा आर्चर जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.चेन्नईकडून चहर-जाडेजा आणि ठाकूर या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 बळी घेतले, त्यांना सँटनरने एक बळी घेत चांगली साथ दिली.