IPL 2019 RR vs DC : जयपूरच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर अजिंक्य रहाणे याने तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले. अजिंक्य रहाणेच्या नाबाद १०५ धावा आणि कर्णधार स्मिथचे दमदार अर्धशतक याच्या जोरावर राजस्थानने २० षटकात ६ बाद १९१ धावा ठोकल्या. अजिक्य रहाणेचे हे IPL कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले.

अजिक्य रहाणेने दिल्लीच्या गोलंदाजांना अक्षरशः धुतले. रहाणेने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर ५८ चेंडूत शतकाला गवसणी घातली. अजिंक्यने त्याच्या या तुफानी खेळीत ६३ चेंडूत नाबाद १०५ धावा कुटल्या. या खेळीमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल ११ चौकार आणि ३ षटकार निघाले. हे अजिंक्यचं IPL कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. या आधी ७ वर्षांपूवी रहाणेने एकमेव IPL शतक झळकावले होते. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात १५ एप्रिल २०१२ ला त्याने ६० चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा शतक झळकावले.

दरम्यान, सामन्यात दिल्लीचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले. अजिंक्य रहाणे याने धावेसाठी नकार दिला असतानाही सलामीवीर संजू सॅमसन धाव घेण्यासाठी पुढे आला. त्यामुळे रबाडाने त्याला धावबाद केले. सॅमसनला एकही चेंडू न खेळता माघारी परतावे लागले. संजू सॅमसन सुरुवातीलाच माघारी परतल्यानंतर कर्णधार स्मिथच्या साथीने अजिंक्य रहाणेने डाव सावरला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने सहाव्या षटकात पन्नाशी गाठली. अतिशय संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने या सामन्यात मात्र तडाखेबाज सुरुवात केली. पॉवर-प्ले मधील फटकेबाजीच्या जोरावर त्याने केवळ ३२ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने ३१ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला आणि दिल्लीला अखेर दिलासा मिळाला. रहाणे – स्मिथ जोडीने शतकी (१३०) भागीदारी केली. यात स्मिथने ८ चौकार लगावले. पाठोपाठ अष्टपैलू बेन स्टोक्स स्वस्तात झेलबाद झाला आणि राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याने ८ धावा केल्या. पण सलामीवीर अजिंक्य रहाणेने एक बाजू लावून धरत तुफान फटकेबाजी केली. त्याने ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रहाणेने शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच टर्नर झेलबाद झाला. त्याने पहिल्या चेंडूवर झेल दिला. स्टुअर्ट बिन्नीही लवकर बाद झाला. त्याने १९ धावा केल्या. पण राहणे शेवटपर्यंत नाबाद राहिला.