किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सने अखरेच्या चेंडूवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत, पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा घेतला. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विंडीजच्या कायरन पोलार्डने मुंबईचं नेतृत्व केलं. त्याच्यात आक्रमक ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने सामन्यात विजय नोंदवला. रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईने स्थानिक खेळाडू सिद्धेश लाडला पसंती दिली. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणारा सिद्धेश लाड, २०१५ सालापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र गेली ५ वर्ष त्याला संघात स्थान मिळत नव्हतं. अखेरीस बुधवारी झालेल्या सामन्यात सिद्धेशने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं.

स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडणाऱ्या सिद्धेशने मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली. आयपीएल कारकिर्दीचा पहिला चेंडू खेळणाऱ्या सिद्धेशने षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. दुर्दैवाने त्याला पहिल्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. १३ चेंडूत १५ धावा केल्यानंतर मोहम्मद शमीने त्याचा त्रिफळा उडवला. मात्र मिळालेल्या संधीचा फायदा घेत सिद्धेशने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. सिद्धेशने पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकारानंतर ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी व कर्णधार रोहित शर्मानेही त्याचं कौतुक केलं.

दरम्यान पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या सिद्धेश लाडने डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र या आक्रमक सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करणं त्याला जमलं नाही. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने काहीकाळ पोलार्डची चांगली साथ दिली. यानंतर मुंबईचा डाव परत कोलमडला. मात्र यानंतर अल्झारी जोसेफच्या साथीने पोलार्डने मुंबईला परत विजयाच्या समीप आणून ठेवलं. मुंबई सामना जिंकणार असं वाटत असताना पोलार्ड अखेरच्या षटकात बाद झाला. अखेरीस अल्झारी जोसेफ आणि चहर यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – IPL 2019 : ‘त्या’ खेळीमुळे सामना फिरला, रविचंद्रन आश्विनकडून पोलार्डचं कौतुक