बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार सौरव गांगुलीने त्याच्यावरील परस्पर हितसंबंध जपल्याच्या आरोपांबाबतचा खुलासा सोमवारी लवाद अधिकाऱ्यांकडे केला. तीन क्रिकेटप्रेमींनी गांगुली दुहेरी पदांचा लाभ उठवत असल्याची तक्रार बीसीसीआयचे लवाद आणि नीतिमूल्य अधिकारी डी. के. जैन यांच्याकडे केली होती. त्यानंतर लवाद अधिकाऱ्यांनी गांगुलीकडून खुलासा मागितला होता.

‘कॅब’चा अध्यक्ष आणि दिल्लीचा सल्लागार अशा दुहेरी भूमिकेबाबत गांगुलीने त्याचे म्हणणे स्पष्ट केले. आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी ६ एप्रिललाच जैन यांच्याकडे खुलासा करणारे पत्र पाठवल्याचे गांगुलीने सांगितले. ‘‘बीसीसीआयच्या कोणत्याही नियमानुसार माझे वर्तन नियमबाह्य नाही. माझ्या दिल्लीच्या सल्लागारपदामुळे कोणत्याही प्रकारे परस्पर हितसंबंध जोपासले जाणे किंवा थेट अथवा वेगळ्या प्रकारे लाभ पदरात पाडल्याचे म्हणता येणार नाही. आयपीएलशी निगडित कोणत्याही बीसीसीआय समितीवर मी कार्यरत नाही. मी पूर्वी तांत्रिक समितीवर होतो, मात्र त्या समितीचा मी याआधीच राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आरोप अमान्य आहेत,’’ असे गांगुलीने लवाद अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी खुलाशात नमूद केले आहे.

रणजीत सील, अभिजीत मुखर्जी आणि भासवती शांतुआ यांनी लवाद अधिकारी जैन यांच्याकडे गांगुलीच्या दुहेरी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत दाद मागितली होती. गांगुली हे ‘कॅब’चे अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्सचे सल्लागार आहेत. त्यामुळे ते स्थानिक क्युरेटरवर दबाव टाकून दिल्लीला हवे तसे मैदान करवून घेऊ शकतील, असा आक्षेप त्यांनी नोंदवला होता. त्या पाश्र्वभूमीवर कोलकाता आणि दिल्ली यांचा सामना १२ एप्रिलला होणार असल्याने क्रिकेटप्रेमींचे लवाद अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.