आयपीएलचा बारावा हंगाम आता आपल्या अखरेच्या पर्वात पोहचला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईने चेन्नईवर मात करत अंतिम फेरीचं तिकीट बूक केलं. दुसरीकडे दिल्लीने हैदराबादवर मात करत अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता शुक्रवारी दिल्ली विरुद्ध चेन्नई या संघांमधली सामन्यात विजेता संघ अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध खेळेल. बाराव्या हंगामातले प्रत्येक सामने हे रंगतदार होत आहेत. बहुतांश सामन्यांचा निकाल हा अखरेच्या षटकांमध्ये लागलाय.

यंदाच्या हंगामाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वच संघातील गोलंदाजांनी केलेली आश्वासक कामगिरी. अनुभवी आणि नवोदीत फिरकीपटू, जलदगती गोलंदाज यांनी अखेरच्या षटकात आपला अनुभव पणाला लावत फलंदाजांच्या धावगतीवर अंकुश लावला. या सर्व गोलंदाजांमध्ये फिरकीपटूंनी जलदगती गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं आहे. सर्वात कमी धावगतीने गोलंदाजी करणाऱ्या १० गोलंदाजांमध्ये ८ गोलंदाज हे फिरकीपटू आहेत.

या दहाही गोलंदाजांमध्ये सनराईजर्स हैदराबादच्या राशिद खानने बाजी मारली आहे. त्याने ६.२८ च्या गतीने धावा दिल्या आहेत. या यादीत जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर या दोन जलदगती गोलंदाजांना स्थान मिळालं आहे. बाराव्या हंगामात अजून दोन सामने होणं बाकी आहे, त्यामुळे चेन्नई आणि दिल्लीच्या गोलंदाजांना या यादीत आपलं स्थान सुधारण्याची चांगली संधी आहे.