हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी कोलकाताच्या संघाने तब्बल तीन मोठे बदल केले. संघातील अनुभवी रॉबिन उथप्पा याला संघाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात महागडे ठरलेले गोलंदाज कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा यांनाही संघातून वगळले. यांच्या जागी रिंकू सिंग, के सी करिअप्पा, पृथ्वी राज यार्रा यांना स्थान देण्यात आले. मात्र सुनील नरिन याला मात्र संघात कायम ठेवले.

सामन्याच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे सुनील नरिन आणि ख्रिस लिन मैदानात उतरले. सुनील नरीनने आपल्या फलंदाजीच्या स्वभावधर्माप्रमाणे तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याच्या खेळीत त्याने ७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यामुळे कोलकाताची धावसंख्या चौथ्या षटकातच चाळीशी पार करून गेली होती. पण त्यानंतर तडाखेबाज सुरुवात केलेला कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिन याला खलील अहमदने अत्यंत चतुराईने त्रिफळाचीत केले. फटकेबाजी करताना खलीलने चेंडू फेकण्याचा वेगात केलेला बदल नरिनला समजू शकला नाही. त्यामुळे त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात तो त्रिफळाचीत झाला. त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत २५ धावा केल्या.

पहा व्हिडीओ –

त्यानंतर फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेला शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. खलीलच्या चेंडूवर विजय शंकरने त्याचा अप्रितम झेल टिपला. त्याने केवळ ३ धावा केल्या. गेल्या सामन्यात तुफानी खेळी करणारा नितीश राणा या सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या आणि तो झेलबाद झाला. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक हा चोरटी धाव घेताना धावचीत झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. त्याने ४ चेंडूत केवळ ६ धावा केल्या.

रॉबिन उथप्पाच्या जागी संघात स्थान मिळालेला रिंकू सिंग ३० धावा करून माघारी परतला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर रशीद खानने त्याचा उत्तम झेल टिपला.सलामीला आलेला ख्रिस लिन संयमी अर्धशतकानंतर बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. यात ४ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसल स्वस्तात झेलबाद झाला. त्याला केवळ १५ धावांचीच भर घालता आली. पियुष चावलादेखील चांगली खेळी करू शकला नाही. अखेर करिअप्पाने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत कोलकाताला १५९ धावांचा टप्पा गाठून दिला.