News Flash

Video : भुवीने भन्नाट झेल घेत थांबवला पूरनचा झंजावात

चेंडू जमिनीच्या अगदी जवळ पोहोचणार इतक्यात त्याने झेल टिपला..

IPL 2019 SRH vs KXIP : हैदराबादच्या संघाने पंजाबवर ४५ धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी ८१ धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे २१३ धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. पण राहुलच्या (७९) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने ३-३ बळी टिपले पंजाबचा हा गेल्या सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला.

२१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने ३ चेंडूत एका चौकारासह ४ धावा केल्या. त्यानंतर भागीदारी होत असतानाच मयंक अग्रवाल बाद झाला. त्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज निकोलस पूरन झेलबाद झाला. त्याने खलील अहमदच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत पहिल्या ४ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारले होते. पण त्या पुढच्या चेंडूवर मात्र त्याने फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू भुवनेश्वर कुमारने अप्रितमपणे झेलला. चेंडू जमिनीच्या अगदी जवळ पोहोचणार इतक्यात त्याने झेल टिपला.

हा पहा व्हिडीओ –

पूरनने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या. त्यानंतर डेव्हिड मिलरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण रशीद खानने आधी डेव्हिड मिलर आणि नंतर पंजाबचा कर्णधार अश्विन असे २ चेंडूत २ बळी टिपले. मिलरने ११ चेंडूत ११ धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

एकीकडे गडी बाद होत असताना लोकेश राहुलने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर सलग २ षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. लोकेश राहुल राहुल ७९ धावांवर बाद झाला. इतर कोणीही जबाबदारीने फलंदाजी केली नाही. त्यामुळे पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याआधी आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी वृद्धीमान साहासोबत ७८ धावांची भागीदारी केली. साहा (२८) माघारी परतल्यानंतर वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने डावाला पुन्हा एकदा आकार दिला. दोन्ही खेळाडूंची पंजाबची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढत धावफलक हलता ठेवला. या दरम्यान वॉर्नरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्याने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रविचंद्रन आश्विनने पांडेला (३६) माघारी धाडत हैदराबादची जमलेली जोडी फोडली.

यानंतर डेव्हिड वॉर्नरही माघारी परतला. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी यावेळी आपली जबाबदारी ओळखत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पंजाबकडून रविचंद्रन आश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यांना अर्शदीप सिंह आणि मुरगन आश्विनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:23 pm

Web Title: ipl 2019 srh vs kxip bhuvaneshwar kumar takes superb catch of nicolas pooran
टॅग : IPL 2019
Next Stories
1 Video : झेल घेण्यासाठी अश्विनने मारली उडी आणि…
2 काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच, ना भारताचे ना पाकिस्तानचे – आफ्रिदी
3 #HappyBirthdayRohit: हिटमॅनच्या नावावर आहेत हे ५० विक्रम
Just Now!
X