IPL 2019 SRH vs MI – मुंबईने हैदराबादला त्यांच्याच मैदानावर रोखला. १३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव केवळ ९६ धावांत आटोपला. मुंबईने सामना ४० धावांनी जिंकला आणि आपली विजयी लय कायम राखली. आपला पहिला IPL सामना खेळणारा अल्झारी जोसेफ याने ६ बळी टिपत मुंबईला कठीण वाटणारा विजय मिळवून दिला. या सामन्यात मलिंगाच्या जागी संधी मिळालेल्या अल्झारी जोसेफ याने १२ धावांत ६ बळी टिपले. याबरोबरच त्याने IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली.

मुंबईच्या संघाने उत्तम गोलंदाजी करत विजय मिळवला. पण मास्टर ब्लास्टर सचिनला मात्र एका गोष्टीची खंत आहे. त्याने ट्विट करून आपली खंत बोलून दाखवली. मुंबईने हैदराबादवर मिळवलेला विजय हा खरंच उत्तम होता. पण हा विजय पाहण्यासाठी मी हैदराबादच्या ‘त्या’ स्टेडियमध्ये उपस्थित नव्हतो, याची मला खंत आहे, असे त्याने ट्विट केले. याशिवाय, त्याने अल्झारी जोसेफचेही कौतुक केले.

अल्झारी जोसेफला मुंबई इंडियन्सनेदेखील खास ट्विट करत कौतुक केले.

दरम्यान, १३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना धोकादायक सलामीवीर जॉनी बेअरस्टो लवकर माघारी परतला आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने १० चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा केल्या. चांगल्या लयीत असलेला डेव्हिड वॉर्नरदेखील पाठोपाठ त्रिफळाचीत झाला. अल्झारी जोसेफने IPL मधील आपल्या पहिल्याच षटकात हैदराबादला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने १३ चेंडूत १५ धावा केल्या. विजय लगेच बाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. आपला पहिला IPL सामना खेळणाऱ्या जोसेफने त्याला माघारी धाडत निर्धाव षटक टाकले. त्यानंतर मनीष पांडे आणि युसूफ पठाण एका पाठोपाठ झेलबाद झाले आणि हैदराबादचा निम्मा संघ गारद झाला. मनीषने १६ धावा केल्या, तर पठाण शून्यावर माघारी परतला. काही वेळात दीपक हुडा आणि रशीद खानदेखील सलग बाद झाले. दीपक हुडाने काही काळ संघर्ष करत २० धावा केल्या. पण त्याचा हैदराबादला फार उपयोग झाला नाही. रशीद खान पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर नबीने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याची झुंज मोडून काढण्यात आली. त्याने ११ धावा केल्या. पाठोपाठ भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांना माघारी पाठवत जोसेफने मुंबईला सामना जिंकवून दिला. त्याने १२ धावा देत ६ बळी टिपले.

त्याआधी हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने पहिल्याच षटकात टाकलेला चेंडू रोहित शर्माच्या पायावर आदळला. पंचानी रोहितला नाबाद ठरवूनही हैदराबादने DRS चा पर्याय स्वीकारला. पण रिव्ह्यूमध्ये देखील तो नाबाद असल्याचे दिसून आले आणि हैदराबादला एकमेव रिव्ह्यूदेखील गमावावा लागला. पहिल्या षटकात नाबाद ठरवण्यात आलेला रोहित शर्मा अखेर चौथ्या षटकात माघारी परतला. मोहम्मद नबीच्या फिरकीचा समाचार घेण्याचा प्रयत्न करताना सीमारेषेवर तो झेलबाद झाला. रोहितने ११ धावा केल्या. मागील सामन्यात अर्धशतक ठोकणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. संदीप शर्माने त्याला ७ धावांवर बाद केले. चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर क्विंटन डी कॉक मोठा फटका खेळताना माघारी परतला आणि नवव्या षटकात मुंबईला तिसरा धक्का बसला. डी कॉकने १८ चेंडूत १९ धावा केल्या. IPL मध्ये आतापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्याला या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. १३ चेंडूत ६ धावा करून तो तंबूत परतला. युवराजच्या जागी संघात स्थान मिळालेला ईशान किशन धावबाद झाला. किशनने २१ चेंडूत १७ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हार्दिक पांड्या या सामन्यात अपयशी ठरला. रशीद खानच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि मुंबईचा सहावा गडी माघारी परतला, हार्दिकने १४ चेंडूत १४ धावा केल्या. फिरकीपटू राहुल चहर झटपट बाद झाला. मात्र त्याने २ चौकार लगावत १० धावा केल्या. फिरकीपटू राहुल चहर झटपट बाद झाला. मात्र त्याने २ चौकार लगावत १० धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात कायरन पोलार्डने फटकेबाजी केली. त्याने ४ षटकार आणि २ चौकार खेचत २६ चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या.