News Flash

IPL 2019 : तब्बल ३ वर्षांनी पुन्हा घडला ‘हा’ अनोखा योगायोग

विराटच्या बंगळुरूवर ११८ धावांनी विजय; दोनही सलामीवीरांनी ठोकली शतकं

IPL 2019 SRH vs RCB : सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर ११८ धावांनी मात केली. बेअरस्टो आणि वॉर्नरच्या दमदार शतकांमुळे हैदराबादने बंगळुरूला २३२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ केवळ ११३ धावांत गारद झाला. मोहम्मद नबीने हैदराबादकडून ११ धावांत ४ बळी टिपले. या विजयाबरोबर हैदराबादच्या डावात ३ वर्षांपूर्वीचा एक अनोखा योगायोग घडला.

बंगळुरूचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पार फसला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो (११४) आणि डेव्हिड वॉर्नर (नाबाद १००) या दोघांच्या शतकी झंजावातापुढे बंगळुरूच्या गोलंदाजांचे कोणतेही अस्त्र चालले नाही. बेअरस्टोने ५६ चेंडूत ११४ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. तर वॉर्नरने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार लगावत नाबाद १०० धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८५ धावांची भक्कम सलामी दिली. त्यांची ही भागीदारी IPL इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. यासह एकाच डावात २ फलंदाजांनी शतक ठोकण्याची ही दुसरीच वेळ ठरली. या आधी विराट कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी २०१६ साली हा पराक्रम केला होता. त्यानंतर IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले.

दरम्यान, सलग ३ वेळा शतकी सलामी देणारी वॉर्नर-बेअरस्टो ही IPL मधील पहिलीच जोडी ठरली. बेअरस्टो बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरनेही १ षटकार खेचत ३ चेंडूत ९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर बरोबर युसूफ पठाण ६ चेंडूत ६ धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे हैदराबादने २० षटकात २ बाद २३१ धावा केल्या.

हैदराबादने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल स्वस्तात माघारी परतला आणि बंगळुरूला पहिला धक्का बसला. त्याने ८ चेंडूत २ चौकारांसह ११ धावा केल्या. उत्तुंग षटकार खेचत फटकेबाजीला सुरुवात केलेल्या हेटमायरला फारशी छाप पाडता आली नाही. तो पुढे येऊन फटका लगावणार तोच त्याला यष्टिचित करण्यात आले. त्याने केवळ ९ धावा केल्या. कर्णधार विराटला सर्वाधिक अपेक्षा असलेला डीव्हिलियर्स (१) त्रिफळाचीत झाला आणि बंगळुरूचा तिसरा गडी माघारी परतला. कर्णधार विराट कोहली धावा काढण्याच्या उद्देशाने फटका खेळला मात्र वॉर्नरने उत्तम झेल टिपला. विराटने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या. डावखुरा अष्टपैलू खेळाडू मोईन अली धावबाद झाला. चोरटी धाव घेताना त्याला संदीप शर्मा आणि नबी यांनी संयुक्त प्रयत्नाने धावबाद केले. त्यामुळे बंगळुरू मोठ्या पराभवाच्या छायेत असून त्यांची अवस्था ५ बाद ३० अशी झाली. देशांतर्गत स्पर्धांमध्ये एका षटकात ५ षटकार लगावण्याची किमया २ वेळा केलेल्या शिवम दुबेला या सामन्यात मात्र फारसे काही जमले नाही. केवळ १ चौकार मारल्यानंतर तो ५ धावांवर झेलबाद झाला आणि बंगळुरूला सहावा धक्का बसला. १६ वर्षीय बर्मनने २४ चेंडूत १९ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्याने २ चौकार लगावले. त्यानंतर उमेश यादव आणि लगेचच डी ग्रँडहोम धावबाद झाले. उमेशने १४ धावा केल्या. डी ग्रँडहोमने मात्र काही काळ झुंज देत ३७ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अखेर चहलला बाद करत हैदराबादने विजयावर शिक्कामोर्तब केले.

केन विल्यमसनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद नबीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ११ धावा देत ४ बळी टिपले. यात पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमायर, डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे या चौघांना त्याने तंबूत धाडले. तसेच मोईन अलीला धावबाद करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 9:31 pm

Web Title: ipl 2019 srh vs rcb 2 batsman score hundred in an innings for only 2nd time in ipl
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : विराटच्या बंगळुरूचा धुव्वा उडवत हैदराबादचा ‘डबल धमाका’
2 IPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो जोडीने मोडला गंभीर-ख्रिस लिनचा विक्रम
3 IPL 2019 : जाणून घ्या मोहम्मद नबी आणि हैदराबादच्या विजयामागचं अनोखं कनेक्शन…
Just Now!
X