आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंनीही आपला ठसा उमटवला आहे. सनराईजर्स हैदराबादच्या राशिद खान आणि मोहम्मद नबी या खेळाडूंनी प्रत्येक वेळी आपली छाप पाडली आहे. रविवारी घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर 118 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादकडून मोहम्मद नबीने मोलाची भूमिका बजावली. नबीने 11 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं.

यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहम्मद नबी हा सनराईजर्स हैदराबाद संघासाठी अत्यंत फायदेशीर मानला जात आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये नबीने 6 सामने खेळले असून, प्रत्येक सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही नबीने पार्थिव पटेल, शेमरॉन हेटमायर, एबी डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे या फलंदाजांना माघारी धाडलं.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुच्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. एकही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. बंगळुरुचे 3 फलंदाज या सामन्यात धावबाद झाले. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान बंगळुरुसमोर असणार आहे.

अवश्य वाचा – ग्लेन मॅक्सवेलकडे विराट कोहलीसारखा खेळाडू बनण्याची क्षमता !