IPL 2019 SRH vs RCB : IPL स्पर्धेत रविवारी पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सुरु आहे. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गेल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे हैदराबादच्या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरुला अद्याप आपले गुणांचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात बंगळुरूच्या कामगिरीबरोबरच वॉर्नर-कोहली यांच्यातील द्वंद्वाकडेदेखील चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

या सामन्यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या सामन्यातून बंगळुरूने IPL ला सर्वात तरुण खेळाडू दिला. सामन्यात हैदराबादच्या संघाने २ बदल केले. केन विल्यमसनच्या जागी मोहम्मद नबी आणि शाहबाझ नदीमच्या जागी दीपक हुडाला संघात स्थान मिळाले. तर बंगळुरूच्या संघात एकमेव बदल करण्यात आला. नवदीप सैनीच्या जागी १६ वर्षीय प्रयास राय बर्मन याला संधी देण्यात आली आहे. प्रयास राय बर्मन हा केवळ १६ वर्षांचा खेळाडू आहे. त्यामुळे तो IPL च्या इतिहासात पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

प्रयासचे वय १६ वर्षे आणि १५७ दिवस आहे. या आधी मुजीब उर रहमान हा IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. त्याने पदार्पण केले तेव्हा त्याचे वय १७ वर्षे आणि ११ दिवस इतके होते. याशिवाय जगातील विविध टी २० क्रिकेट स्पर्धांमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकीदेखील त्याला एक खेळाडू ठरण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे IPLचा सर्वात तरूण खेळाडू कशी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.