IPL 2019 SRH vs RCB : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार शतकांमुळे हैदराबादने बंगळुरूला २३२ धावांचे आव्हान दिले.

बंगळुरूचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पार फसला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो (११४) आणि डेव्हिड वॉर्नर (नाबाद १००) या दोघांच्या शतकी झंजावातापुढे बंगळुरूच्या गोलंदाजांचे कोणतेही अस्त्र चालले नाही. बेअरस्टोने ५६ चेंडूत ११४ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. तर वॉर्नरने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार लगावत नाबाद १०० धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८४ धावांची भक्कम सलामी दिली. याबरोबरच सलग ३ वेळा शतकी सलामी देणारी ही IPL मधील पहिलीच जोडी ठरली. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यात त्यांनी पहिल्या सामन्यात ११८ धावांची सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात ११० धावांची सलामी दिली. तर तिसऱ्या सामन्यात १८५ धावांची सलामी दिली.

दरम्यान, बेअरस्टो बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरनेही १ षटकार खेचत ३ चेंडूत ९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर बरोबर युसूफ पठाण ६ चेंडूत ६ धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे हैदराबादने २० षटकात २ बाद २३१ धावा केल्या.

या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल स्वस्तात माघारी परतला आणि बंगळुरूला पहिला धक्का बसला. त्याने ८ चेंडूत २ चौकारांसह ११ धावा केल्या. उत्तुंग षटकार खेचत फटकेबाजीला सुरुवात केलेल्या हेटमायरला फारशी छाप पाडता आली नाही. तो पुढे येऊन फटका लगावणार तोच त्याला यष्टिचित करण्यात आले. त्याने केवळ ९ धावा केल्या. कर्णधार विराटला सर्वाधिक अपेक्षा असलेला डीव्हिलियर्स (१) त्रिफळाचीत झाला आणि बंगळुरूचा तिसरा गडी माघारी परतला. कर्णधार विराट कोहली धावा काढण्याच्या उद्देशाने फटका खेळला मात्र वॉर्नरने उत्तम झेल टिपला. विराटने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या. डावखुरा अष्टपैलू खेळाडू मोईन अली धावबाद झाला. चोरटी धाव घेताना त्याला संदीप शर्मा आणि नबी यांनी संयुक्त प्रयत्नाने धावबाद केले. त्यामुळे बंगळुरू मोठ्या पराभवाच्या छायेत असून त्यांची अवस्था ५ बाद ३० अशी झाली. देशांतर्गत स्पर्धांमध्ये एका षटकात ५ षटकार लगावण्याची किमया २ वेळा केलेल्या शिवम दुबेला या सामन्यात मात्र फारसे काही जमले नाही. केवळ १ चौकार मारल्यानंतर तो ५ धावांवर झेलबाद झाला आणि बंगळुरूला सहावा धक्का बसला. तळाच्या फलंदाजांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरला, पण त्यांचे प्रयत्न पुरेसे नव्हते.

केन विल्यमसनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद नबीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ११ धावा देत ४ बळी टिपले. यात पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमायर, डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे या चौघांना त्याने तंबूत धाडले. तसेच मोईन अलीला धावबाद करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.