IPL 2019 च्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच सामन्यात RCB च्या फलंदाजांनी CSK च्या फिरकीपटूंच्या माऱ्यापुढे शरणागती पत्करली आणि केवळ ७० धावांमध्ये त्याचा डाव आटोपला. RCB कडून केवळ १ गडी दुहेरी धावसंख्या गाठू शकला. बाकी १० गडी एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. केवळ सलामीवीर पार्थिव पटेल याने २९ धावांची अत्यंत संयमी खेळी केली. त्याने १७.१ षटकांच्या खेळात केवळ ३५ चेंडू खेळले. त्याने २९ धावांच्या खेळीत केवळ २ चौकार लगावले. पण त्याने पूर्ण वेळ खेळपट्टीवर तग धरला. त्यानंतर पार्थिव पटेलची नेटकऱ्यांनी स्तुती केली.

दरम्यान, RCB च्या डावाला खरा सुरुंग लावला तो अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने. त्याने आपल्या ४ षटकाच्या गोलंदाजीत RCB च्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. भारताकडून तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजीस येणारा कर्णधार विराट कोहली RCB कडून सलामीला आला. पण त्याला हात मोकळे करण्यास आणि फटके मारण्यास जमले नाही. ३ षटकात मोठा फटका खेळण्यास अपयश आल्याने त्याने हरभजनच्या गोलंदाजीवर हवेत चेंडू फटकावला, पण तो चेंडू जडेजाच्या हाती जाऊन विसावला आणि हरभजनला यंदाच्या हंगामातील पहिला बळी टिपण्याचा मान मिळाला. त्यानंतर इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज मोईन अली याने हरभजनला उत्तुंग षटकार लगावला. पण हरभजनने त्यालाही त्याच षटकात झेलबाद करून माघारी धाडले. आपल्या शेवटच्या षटकात हरभजनने एबी डीव्हिलियर्सला माघारी धाडले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलो तरी मी अजूनही स्पर्धेत आहे, हे दाखवून दिले.

दरम्यान, हरभजनची गोलंदाजी संपल्यानंतरदेखील RCB ची पडझड सुरूच राहिली. IPL मध्ये पदार्पण केलेला हेटमायर शून्यावर माघारी परतला आणि बंगळुरुला चौथा धक्का बसला. तो चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना बाद झाला. पाठोपाठ शिवम दुबे माघारी परतला आणि बंगळुरुला पाचवा धक्का बसला. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर शेन वॉटसनने त्याचा झेल पकडला. लगेचच कॉलिन डी-ग्रँडहोम बाद झाला. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने त्याचा झेल घेतला आणि बंगळुरुचा सहावा गडी माघारी धाडला. नवोदित नवदीप सैनीदेखील झटपट माघारी परतला आणि बंगळुरुला सातवा धक्का बसला. इम्रान ताहीरने त्याला बाद केले. युझवेंद्र चहलदेखील हवेत चेंडू फटकावत बाद झाला. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर हरभजनने त्याचा झेल घेतला. त्यानंतर रविंद्र जाडेजाने उमेश यादवचा त्रिफळा उडवत बंगळुरुला नववा एक धक्का दिला. सलामीपासून एक बाजू लावून धरलेला पार्थिव पटेल अखेर २९ धावा करून झेलबाद झाला आणि ७० धावांवर त्यांचा डाव गडगडला.