IPL 2019 मध्ये सोमवारी (१ एप्रिल) चेन्नई सुपरकिंग्ज संघाने घरच्या मैदानावर राजस्थानवर ८ धावांनी मात केली. अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना ब्राव्होने राजस्थानच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात ब्राव्होच्या गोलंदाजीची कौतुक झालेच, पण या सोबतच आणखी एक किस्सा घडला. IPL मध्ये अशी गोष्ट घडेल, असा विचारही कोणी कधी केला नसेल. कारण IPL मध्येच नव्हे तर कोणत्याही सामन्यात असा प्रकार घडल्याचे कदाचित पाहायला मिळाला नसेल. पण सध्या IPL मधला एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

चेन्नईमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील सामन्यात IPL चे समालोचन काही वेळेसाठी खुर्चीवर उभे राहून करण्यात आले. हा सामना खेळवला जात असताना माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन समालोचन करत होते. त्यावेळी समालोचन कक्षाच्या काचेवर भरपूर दव होते. त्यामुळे समालोचन करताना सामन्यात नेमके काय चालू आहे, हे पाहण्यासाठी शिवरामकृष्णन यांना थेट खुर्चीवर उभे राहावे लागले आणि समालोचन करावे लागले. त्यांचा सहकारी मॅथ्यू हेडन याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान, १७६ त्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली होती. सलामीचे ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. मात्र मधल्या फळीत त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यानंतर आर्चर-स्टोक्स जोडीने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. मात्र अखेरच्या षटकात स्टोक्स माघारी परतल्याने राजस्थानच्या आशेवर पाणी फिरलं. ब्राव्होने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या संघाची विजयी परंपरा कायम राखली.

त्याआधी, कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर खेळत असताना आश्वासक धावसंख्या उभी केली. चांगली सुरुवात झालेली नसतानाही, धोनीने आधी सुरेश रैना आणि नंतर ब्राव्होच्या मदतीने संघाला 150 धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. 20 षटकात चेन्नईचा संघ 175 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

अंबाती रायुडू, शेन वॉटसन आणि केदार जाधव हे 3 फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या या कामगिरीमुळे चेन्नईची अवस्था काही क्षणांसाठी 27/3 अशी झाली होती. यानंतर सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी जोडीने संघाचा डाव सावरला.

या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे चेन्नईने आश्वासक धावसंख्या गाठली. जयदेव उनाडकटने रैनाचा त्रिफळा उडवत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. यानंतर रैनाने ब्राव्होच्या मदतीने संघाची बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. धोनीने 46 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याला अखेरच्या षटकात ब्राव्होनेही चांगली साथ दिली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 2 बळी घेतले. त्याला बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी यांनी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.