IPL 2019 : या स्पर्धेच्या १२ व्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. बंगळुरूने IPL चा निरोप जरी विजयाने घेतला असला, तरीही गुणतालिकेत गुणतालिकेत त्यांना ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बंगळुरूच्या संघाला अनेक सामन्यात शेवटच्या टप्प्यात पराभव पत्करावा लागला, तर काही वेळा त्यांना नशिबाची साथ मिळू शकली नाही. बंगळुरूच्या कामगिरीवर चाहत्यांनी तर टीका केलीच, पण काही खंभीर पाठीराख्यांनी विराट आणि इतर खेळाडूंना शेवटच्या दिवशीही पाठिंबा दिल्याचे पोस्टरच्या माध्यमातून दाखवून दिले. पण असे असले तरी बंगळुरू संघाचा माजी मालक आणि सध्या फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने विराट आणि कंपनीच्या कामगिरीवर टीका केली आहे.

मल्ल्याने ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. बंगळुरूचा संघ पाहिलात, तर तुम्हाला त्यात कायम चांगले आणि प्रतिभावान खेळाडू दिसतील. पण त्याची प्रतिभा मैदानावर दिसण्यात कुठेतरी कमी पडते, कारण हे खेळाडू आणि हा संघ केवळ कागदावरच हिरो आहेत. मैदानावर मात्र खेळत नाहीत, असे विजय मल्ल्याने ट्विट केले आहे.

दरम्यान, बंगळुरूच्या शेवटच्या साखळी सामन्यात शिमरॉन हेटमायर (७५) आणि गुरकीरत सिंग (६५) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला. विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला. कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली. विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले. गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली. पण अंतिम टप्प्यात फटकेबाजी करताना हेटमायर ७५ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ गुरकिरतही ६५ धावांवर बाद झाला. पण अखेर शेवटच्या षटकात २ चौकार खेचत उमेश यादवने बंगळुरूला विजय मिळवून दिला.

त्याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावगतीवर चांगलाच अंकुश लावला. वृद्धीमान साहा (२०) आणि मार्टीन गप्टील (३०) जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र साहा माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. शंकर (२७) माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला पुन्हा गळती लागली. एकीकडे फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद ७० धावा केल्या.

बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने ३, नवदीप सैनीने २ तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.