महेंद्रसिंह धोनी हा मैदानावर ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखला जातो. प्रसंग कितीही खडतर असो, धोनी शांत डोक्याने रणनिती आखत आपल्या संघाला सामना जिंकवून देत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. मात्र शनिवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीचं एक वेगळं रुप त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. शेवटच्या दोन षटकात विजयासाठी ३९ धावा हव्या असताना धोनीने दिपक चहरला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र दिपकने पहिले दोन बॉल नो-बॉल टाकत पंजाबला धावा बहाल केल्या. दुसरा नो-बॉल टाकल्यानंतर अखेर धोनीचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने चहरपाशी जात त्याला कठोर शब्दात नेमकी कुठे गोलंदाजी करायची हे सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र धोनीने कठोर शब्दांमध्ये दिलेल्या या सल्ल्याचा दिपक चहरला फायदा झाल्याचं दिसलं. दुसऱ्या नो-बॉल नंतर दिपकने दमदार पुनरागमन केलं. याच षटकात दिपकने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवत एका अर्थाने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यान, चेन्नईकडून 161 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ 138 धावांपर्यंतच मजल मारु शकला. घरच्या मैदानावर खेळत असताना चेन्नईने पंजाबवर 22 धावांनी मात केली. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, पंजाबची सुरुवात खराब झाली. भरवशाचा ख्रिस गेल झटपट माघारी परतला. यानंतर मयांक अग्रवालही हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि सरफराज खान यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान दोघांनीही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावगती वाढवणं त्यांना जमलं नाही.

याचाच परिणाम म्हणजे, अखेरच्या 4 षटकांमध्ये पंजाबसमोरचं आव्हान वाढलं. त्यातचं चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करत पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी परतला. 19 व्या षटकात दिपक चहरने सुरुवातीच्या दोन चेंडूवर स्वैर मारा करत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत दिपकने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला.