चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रविवारी चाहत्यांना दोन सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. दुपारी होणाऱ्या पहिल्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सला नमवून सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ उत्सुक आहे.

’ वेळ : दुपारी ३.३० वा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : सांघिक कामगिरीवर भिस्त

अन्य संघाच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ यंदा उत्तम सांघिक कामगिरी करत असल्याने सध्या ते गुणतालिकेत अग्रस्थानी आहेत. कोहलीसह ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स लयीत असल्यामुळे बेंगळूरुला फलंदाजीत फारशी चिंता करण्याचे कारण नाही. देवदत्त पडिक्कलकडून मात्र यावेळी त्यांना दमदार सलामीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल बेंगळूरुसाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. त्याशिवाय मोहम्मद सिराज, कायले जेमिसन, यजुर्वेद्र चहल असे वैविध्यपूर्ण गोलंदाजीचे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

कोलकाता नाइट रायडर्स : विदेशी फलंदाजांची कसोटी

नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि शुभमन गिल हे कोलकाताचे आघाडीचे फलंदाज आतापर्यंत छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. परंतु कर्णधार इऑन मॉर्गनसह आंद्रे रसेल आणि शाकिब अल हसन हे विदेशी फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने कोलकाताला मुंबई इंडियन्सविरुद्ध हातातील सामना गमवावा लागला. बेंगळूरुच्या तुलनेत कोलकाताकडे हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब असे अनुभवी फिरकी त्रिकुट आहे. त्यामुळे फिरकीला पोषक खेळपट्टीवर ते बेंगळूरुवर वर्चस्व गाजवू शकतात.