आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत काही अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक खेळाडूंवर कोटींची बोली लागल्याचे चित्र यंदाच्या लिलावामध्ये दिसत आहे. अशीच कोटींची बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये एका खास मुंबईकराचा समावेश आहे. या मुंबईकर खेळाडूचे नाव आहे यशस्वी जैस्वाल. यशस्वीला राजस्थान रॉयल्स संघाने २ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे एकेकाळी क्रिकेटचे धडे घेत मुंबईमध्ये पाणीपुरी विकून दिवस ढकलणारा यशस्वी आता कोट्यधीश झाला आहे.

घरची परिस्थिती हलाखीची, वडिलांचे एक दुकान, पण कुटुंबातील दोन मुले आणि पत्नीला सांभाळता येईल इतके त्यांचे उत्पन्न नव्हते अशा परिस्थितीतही आपल्याला क्रिकेटपटू व्हायचेय असं यशस्वीने लहानपणीच ठरवलं होतं. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वीने भारतामध्ये क्रिकेटची पंढरी समजली जाणारी मुंबई गाठली. २०११ मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही करावा लागला. परंतु २०१३ मध्ये प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याच्यातील कौशल्य ओळखून त्याला पाठबळ दिले. ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीने क्रिकेट कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. तेव्हापासूनच त्याने घेतलेली उत्तुंग भरारी पाहण्याजोगी आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहताना आयुष्यात कधी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेटही खेळायला मिळेल की नाही, अशी शंका असताना या पठ्ठय़ाने केलेली कामगिरी स्वप्नवतच म्हणावी लागेल.

बांगलादेशमध्ये झालेल्या २०१८ च्या आशिया चषक युवा (१९ वर्षांखालील) स्पर्धेतही यशस्वीने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. यशस्वीने यंदाच्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत एक द्विशतक आणि दोन शतके झळकावत क्रिकेटविश्वाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. याशिवाय १७ वर्षांचा यशस्वी अ श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम यशस्वीने केला.

याच कामगिरीच्या जोरावर राजस्थानने यशस्वीवर यंदा दोन कोटींहून अधिकची बोली लावली आहे. त्यामुळे आता यशस्वी यंदाच्या आयपीएलमध्ये विजय हजारे चषक स्पर्धेप्रमाणे दमदार कामगिरी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

द्विशतकानंतर आई-वडील म्हणाले होते…

उत्तर प्रदेश येथील भदोही जिल्ह्य़ात राहणाऱ्या भुपेंद्र आणि कांचन यांच्या पोटी यशस्वीचा जन्म झाला. रंगविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या यशस्वीव्यतिरिक्त आणखी तीन मुले आहेत. ‘‘यशस्वीने एकेक करून यशाची शिखरे सर केल्यामुळे आता आमच्या वाटय़ालाही चांगले दिवस आले आहेत. एकेकाळी आमच्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची. त्या वेळी कॅटररकडे मी काम करायचो. परंतु आता यशस्वीच्या लक्षवेधी कामगिरीमुळे आम्हाला बऱ्याच कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाते. त्याशिवाय नातेवाईक आणि राजकीय नेत्यांकडूनही आम्हाला मानसन्मान देण्यात येतो,’’ असे भुपेंद्र यांनी विजय हजारे चषक स्पर्धेमध्ये यशस्वीने द्विशतक झळकावल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.

“यशस्वी मुंबईला गेल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की, आम्ही त्याच्याशी संवाद साधला नाही. १०-१२ वर्षांपूर्वीची आमची परिस्थिती आठवून आजही अंगावर काटा येतो. त्यामुळेच यशस्वीची प्रगती मला स्वत:लाही फार प्रेरणा देते. त्याशिवाय यशस्वीने आगामी मुश्ताक अली स्पर्धेतही छाप पाडून भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करावे, अशी आमची इच्छा आहे,” असं भुपेंद्र सांगतात.

‘‘यशस्वीला बालपणापासूनच सचिनसारखी फलंदाजी करण्याचे लक्ष्य होते. सचिनसारखी फलंदाजी करणे तुला जमणार आहे का? असे कित्येक वेळा त्याचे वडील मुद्दामहून त्याला खिजवायचे. परंतु यशस्वीने मनाशी गाठ बांधली होती आणि अखेरीस आम्ही त्याला मुंबईत काकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला,’’ असे यशस्वीची आई कांचन यांनी त्याच्या द्विशतकानंतर बोलताना सांगितले.