IPL 2020 नंतर बुधवारी (१७ नोव्हेंबर) झालेल्या पाकिस्तान सुपर लीग टी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कराची किंग्ज संघाने लाहोर कलंदर्सचा ५ गडी राखून पराभव केला. सलामीवीर बाबर आझमच्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकी (६३) खेळीच्या जोरावर कराची किंग्जने पहिल्यांदाच PSLचे विजेतेपद पटकावले. कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या PSL 5 च्या अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १३४ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून सलामीवीर तमिम इक्बालने सर्वाधिक ३५ धावा केल्या होत्या. १३५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझमने संघाला सहज विजय मिळवून दिला.

अंतिम सामन्यात विजेता ठरलेल्या कराची संघात एक मुंबई इंडियन्सचाही खेळाडू दिसून आला. त्या खेळाडूचं नाव शेरफान रूदरफर्ड. शेरफान यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघात होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. असे असले तरी मुंबईच्या विजयी चमूत त्याचा समावेश होता. गेल्या मंगळवारी मुंबई इंडियन्सकडून स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत त्याला PSL चे विजेतेपददेखील मिळाले.

लाहोर कलंदर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना त्यांची सुरूवात चांगली झाली होती. पहिल्या १० षटकात त्यांचा एकही गडी बाद झाला नव्हता, पण १०व्या षटकात दोनही सलामीवीर माघारी परतले आणि डावाच्या घसरणीला सुरूवात झाली. बिनबाद ६८ वरून संघाची अवस्था ३ बाद ७० अशी झाली होती. त्यानंतर सोहेल अख्तर (१४), डेव्हिड विसे (१४) आणि शाहिन आफ्रिदी (१२) यांच्या छोटेखानी खेळींच्या जोरावर संघाने १३४ पर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना शार्जिल खान (१३) आणि अलेक्स हेल्स (११) लवकर बाद झाले. पण सलामीवीर बाबर आझम आणि चॅडविक वॉल्टन यांच्या भागीदारीमुळे संघाला विजय मिळवणं शक्य झालं.