क्रिकेट ऑस्ट्रेलिया यंदाच्या T20 World Cup च्या आयोजनातून काढता पाय घेण्याची चिन्हे दिसताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2020 चे नियोजन सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे. IPL स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसले, तरी BCCI ने सध्या स्पर्धेच्या आयोजनासाठी तात्पुरती तारीख निश्चित केल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. मिररच्या वृत्तानुसार, IPL 2020 चे आयोजन सप्टेंबरच्या शेवटच्या काही दिवसांपासून ते नोव्हेंबरच्या सुरूवातीच्या दिवसांपर्यंतच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे. त्यातही २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या दरम्यान IPL 2020 ची नियोजन होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय झाल्यावरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

IPL 2020 स्पर्धेतील सुरूवातीचे सामने सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्यास, पावसाचे वेळापत्रक लक्षात घेता, हे सामने दक्षिणेकडील विभागांत खेळवण्याची शक्यता आहे. याचे कारण बंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये त्या कालावधीत या तारखांमध्ये मान्सून फार तीव्र नसतो. स्पर्धेचा उत्तरार्ध मात्र करोनामुळे झालेली परिस्थिती सुधारल्यास मुंबईमध्ये खेळला जाऊ शकतो. मिररने आधी दिलेल्या वृत्तानुसार, पायाभूत सुविधा, चार आंतरराष्ट्रीय स्टेडियम, प्रवासातील सुलभता आणि उच्चभ्रू हॉटेल्स या साऱ्या गोष्टी पाहता BCCI ची IPL 2020 साठी पहिली पसंती मुंबई शहरालाच होती. पण करोनाची वाढती प्रकरणे पाहता तेथे स्पर्धेचे आयोजन करणे टाळले जात आहे. कर्नाटक किंवा तामिळनाडू हादेखील पर्याय BCCI पुढे उपलब्ध आहेत. करोनाची प्रकरणे या राज्यातही आहेतच, पण TNPL आणि KPL सारख्या स्पर्धा जेथे खेळवल्या जातात, त्या ठिकाणी IPL 2020 चे आयोजन करणे शक्य आहे. कारण, IPL चे आयोजन विनाप्रेक्षक करायचे असल्याने स्टेडियमचा आकार किती मोठा आहे? याने फारसा फरक पडणार नाही.

IPL चे संघ आणि खेळाडू यांना अद्याप या संदर्भात औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही, परंतु संघ व्यवस्थापनांच्या जबाबदार व्यक्तिंशी अनौपचारिक चर्चा सुरू आहे. संघ व्यवस्थापनातील काही व्यक्तींना या गोष्टींना दुजोरा दिला असून स्पर्धा नक्की खेळवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला असल्याचेही सांगितले जात आहे.