आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज होताना दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या प्रशिक्षण वर्गात मोठे बदल केले आहेत. संघाच्या Talent Scout Development Wing ची जबाबदारी आता माजी यष्टीरक्षक विजय दहियाकडे आलेली आहे. प्रवीण आमरे यांनी आपल्या पदावरुन पायउतार होणं पसंत केलं आहे. गेली ५ वर्ष आमरे दिल्ली संघासाठी नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सांभाळत होते.

आपण आतापर्यंत केलेल्या कामावर समाधानी असल्याचं आमरेंनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. आपल्या कारकिर्दीतल श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यासारख्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाल्याचं समाधान असल्याचंही आमरेंनी स्पष्ट केलं. “मी विचार करुन आणि सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे. माझ्या परिवाराला आता माझी गरज आहे. माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली होती ती पूर्ण करु शकलो याचा मला आनंद आहे.”

अवश्य वाचा – IPL 2020 : ‘या’ बांगलादेशी खेळाडूची लिलावामधून माघार

मध्यंतरी प्रवीण आमरेंनी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. मात्र कपिल देव यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने विक्रम राठोड यांना आपली पसंती दिली. यामुळे आमरे नाराज असल्याचंही समजतंय. “यापुढे मला कोणी सांगितल्याशिवाय मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नाही. आतापर्यंत मी तीनवेळा अर्ज केला, मात्र बीसीसीआयला आपली गरज नसल्यामुळे अर्ज करण्यात काहीच उपयोग नसल्याचं मला समजलं आहे.” आमरेंनी आपली नाराजी स्पष्ट केली.