मुंबई : संयुक्त अरब अमिरातीमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामातील आठ संघांपैकी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या चार संघांना मुंबईच्या १० मार्गदर्शकांचे बळ लाभले आहे.

मुंबईचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा ‘आयकॉन’ म्हणजेच सदिच्छादूत आहे. माजी वेगवान गोलंदाज झहीर खान क्रिकेट कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहे. याशिवाय माजी फलंदाज प्रवीण अमरे आणि माजी वेगवान गोलंदाज अ‍ॅबी कुरुविल्ला यांच्याकडे उच्च कामगिरी आणि गुणवत्ता शोधाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर प्रतीक कदम खेळाडूंच्या क्षमतानुरूप सरावाकडे लक्ष देतो.

राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालकपद माजी क्रिकेटपटू झुबिन भरूचा गेली अनेक वर्षे सांभाळत आहेत. मुंबईकर माजी फलंदाज अमोल मुझुमदार आणि माजी गोलंदाज साईराज बहुतुले यांच्याकडे अनुक्रमे फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षकपद राजस्थानने सोपवले आहे. मुंबईचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर कोलकाता नाइट रायडर्सचा साहाय्यक प्रशिक्षक आहे, तर ओमकार साळवी गोलंदाजीचे साहाय्यक प्रशिक्षकपद सांभाळतो. याशिवाय नुकत्याच झालेल्या कॅ रेबियन प्रीमियर लीगमध्ये लक्ष वेधणारा प्रवीण तांबे फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करतो. माजी सलामीवीर वसिम जाफर किंग्ज इलेव्हन पंजाबचे फलंदाजीचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे.

दक्षिणेकडील संघांकडून नापसंती

मुंबईच्या मार्गदर्शकांबाबत चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद या दक्षिणेकडील संघांनी नापसंती दर्शवली आहे. या तीन संघांसह अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि तुषार देशपांडे या मुंबईकरांचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने मार्गदर्शकांच्या फळीत मुंबईला स्थान दिले नाही.

भारतीय क्रिकेटला वर्षांनुवर्षे मुंबई क्रिकेटने गुणवत्तेची रसद दिली आहे. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे मातब्बर क्रिकेटपटू मुंबईने भारतीय क्रिकेटला दिले आहेत. तसेच आता मुंबईतून उत्तम प्रशिक्षक अनेक संघांना उपलब्ध होत आहे. साहाय्यक मार्गदर्शकांच्या फळीत अनेक गुणी मुंबईकर दिसतात. ‘आयपीएल’मध्येही गेली अनेक वर्षे मुंबईकर मार्गदर्शकांची मक्तेदारी दिसून येत आहे.

लालचंद रजपूत, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक