IPL 2020 स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवली जाणार आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं पटेल म्हणाले. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात IPL 2020चे आयोजन केले जाणार आहे. UAEमध्ये IPLचा हंगाम रंगल्यावर त्याचा फायदा कोणत्या संघाला अधिक होईल याबद्दल आता चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने थेट स्पर्धेचं विजेतेपद कोणता संघ पटकावेल याचाच अंदाज वर्तवला आहे.

“माझा असा अंदाज आहे की दोन संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मला वाटतं की मुंबई इंडियन्सचा संघ पाचवं विजेतेपद मिळवू शकतो. मुंबईचा संघ संतुलित आहे. त्यांच्याकडे वरच्या फळीत चार तडगे फलंदाज आहेत. तसेच चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजीचा भारही अनुभवी बुमराह आणि मलिंगा यांच्या खांद्यावर आहे. हार्दिक पांड्या दुखापतीनंतर प्रथमच स्पर्धेत खेळणार आहे. त्याच्याकडे गोड बातमीदेखील आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेने तो खेळेल आणि स्पर्धेचा हिरो ठरेल असं मला वाटतं”, असं हॉग म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग

“IPL विजेतेपदाचा दुसरा दावेदार म्हणजे बंगळुरूचा संघ. त्यांच्याकडे कायम चांगले खेळाडू असतात पण त्यांच्या फायदा संघाला हवा तसा होत नाही. यावेळी त्यांना चांगली संधी आहे. फिंचला त्यांच्या संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये तो चांगली फटकेबाजी करू शकतो. त्याचा फायदा मधल्या फळीतील विराट आणि डीव्हिलियर्स यांना होईल. गोलंदाजीतही त्यांच्याकडे डेल स्टेन आणि केन रिचर्डसन असे दोन खेळाडू आहेत. त्यामुळे नीट योजना आखून खेळल्यास त्यांना विजेतेपदाची संधी आहे”, असे हॉगने सांगितले.