आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अ१९धिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी अद्याप केंद्र सरकारकडून परवानगी आली नसली तरीही येत्या काही दिवसांत ती मिळेल अशी माहिती गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. केंद्र सरकारच्या इतर विभागांनी स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला असून उर्वरित परवानग्या लवकरच मिळतील अशी माहिती गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली, १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रकानुसार अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. याचसोबत सर्व सामने हे रात्री साडे सात वाजता सुरु होणार असल्याचं कळतंय.

जाणून घेऊयात गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतले १० महत्वाचे मुद्दे –

१) १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये रंगणार आयपीएलचा तेरावा हंगाम.

२) आयपीएलच्या सर्व सामन्यांची वेळ रात्री साडेसात वाजता हलवण्यात आली आहे. याचसोबत दुपारचे सामने साडे तीन वाजता खेळवले जाणार आहेत.

३) २० ऑगस्टनंतर संघ युएईकरता रवाना होती. प्रत्येक संघात २४ खेळाडूच असतील.

४) एखाद्या खेळाडूला करोनाची लागण झाली तर त्याच्या बदल्यात बदली खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

५) सुरुवातीच्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी नाही. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन ठराविक प्रेक्षकांना संधी देण्याचा निर्णय युएई सरकार घेईल.

६) सर्व खेळाडू (भारतीय किंवा परदेशी) हे चार्टर्ड विमानाने प्रवास करतील.

७) खेळाडू आणि इतर सदस्यांसाठीची मार्गदर्शक तत्व आणि Bio Secure Bubble चे नियम पाळणं ही प्रत्येक संघ आणि खेळाडूची जबाबदारी असेल.

८) युएईमधील अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर व इतर वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यासाठी मदत करतील.

९) VIVO कंपनीसह सर्व महत्वाच्या चिनी कंपन्यांची स्पॉन्सरशीप कायम ठेवण्याचा गव्हर्निंग काऊन्सिलचा निर्णय

१०) महिला आयपीएल स्पर्धेलाही मान्यता, १ ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार स्पर्धा